जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत असल्याने जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी पशुधन विभागाकडे पत्र पाठवून चाऱ्याची सविस्तर माहिती मागविली आहे.
गेल्या एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून पावसाने पाठ फिरविली. परिणामी खरीप पिकासोबतच गायरानातील चारा वाळू लागला आहे. पाऊस नसल्यामुळे पिकासोबतच पशुधनाच्या चाऱ्यावर गंडांतर येण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात ६ लाख जनावरांची संख्या असून मोठय़ा जनावरांची संख्या ४ लाख तर लहान जनावरांची संख्या २ लाख आहे. जनावराला प्रतिदिन किमान ९ किलो चारा लागतो. ज्यामध्ये मोठय़ा जनावरांना सहा किलो तर लहान जनावराला तीन किलो चाऱ्याची गरज आहे.
पाऊस रुसल्याने खरीप पिकासोबतच गवत वाळू लागल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी कासार व निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांनी पशुसंवर्धन विभागाकडे पत्र पाठवून चाऱ्याची सविस्तर माहिती मागविली होती. त्यानुसार विभागाकडे केवळ पंधरा दिवस पुरेल एवढा चारा उपलब्ध असल्याचे पशुसंवर्धन विभागाने कळविले आहे. आता पावसाअभावी हलक्या जमिनीवरील पिके वाळून गेली, तर चांगल्या जमिनीतील पिके माना टाकू लागली आहेत. येत्या आठ दिवसात पाऊस झाला तर उर्वरित पिकासह चाऱ्याला जीवदान मिळू शकते. परंतु आठ दिवसात पावसाने दडी मारल्यास जनावरांसाठी चारा छावण्या उघडण्याची वेळ येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने जिल्हा प्रशासनाला दिली आहे.