देशात सर्वात जास्त वाघ कर्नाटकात आहेत. महाराष्ट्रातसुद्धा वाघांच्या संख्या वाढत आहे. वाघांच्या संरक्षण व संवर्धनात कर्नाटकने केलेल्या कामगिरीच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रातही त्याच पद्धतीच्या व्यवस्थापनाची अंमलबजावणी केली जावी, या पाश्र्वभूमीवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कर्नाटकच्या चमूला राज्यात येण्याचे निमंत्रण दिले आहे. परस्परांच्या सहकार्याने दोन्ही राज्ये पर्यावरणाचा समतोल साधत वनक्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बंगलोर येथील बॉटॅनिकल गार्डनचा पाहणी दौरा सुधीर मुनगंटीवार यांनी केला. या दरम्यान त्यांनी देशातील सर्वच राज्यात उत्तम गोष्टी असून त्याचे आदान-प्रदान केल्यास देश अधिक देखणा व प्रगत होईल, असे ते म्हणाले. हवामानातील बदल व पर्यावरणाचा असमतोलामुळे घाबरून न जाता सर्वच राज्यांनी प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. बंगलोर येथील बॉटॅनिकल गार्डनच्या धर्तीवर महाराष्ट्रातही असे गार्डन तयार करणार आहोत. यात कर्नाटकचे सहकार्य हवे आहे. २०१५-२०१६ च्या अर्थसंकल्पात मुनगंटीवार यांनी चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर बंगलोरच्या धर्तीवर बॉटॅनिकल गार्डनची निर्मिती करण्याची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने शासन निर्णयही जारी केला आहे. या गार्डनच्या निर्मितीच्या पाश्र्वभूमीवर बंगलोर येथील गार्डनचा पाहणी दौरा त्यांनी केला.
या दौऱ्यात प्रामुख्याने लालबाग गार्डन, बटरफ्लाय गार्डन, नदी हिल्सजवळचे ट्री पार्क, बनेरघट्टा येथील जंगल रिसॉर्ट, जैवविविधता पार्क, अशा सर्वच ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. लालबाग गार्डनच्या व्यवस्थापनाबद्दल त्यांनी माहिती घेतली. येणाऱ्या पिढीकरिता उत्तम वारसा आपण दिला पाहिजे, असे मत मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केले. या दौऱ्यात वन सचिव विकास खारगे, सामाजिक वनीकरण विभागाचे संचालक चढ्ढा, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, कर्नाटकचे अप्पर मुख्य वनसंरक्षक (प्रकल्प) जयराम, अप्पर मुख्य वनसंरक्षक अनुर रेड्डी, सुगारा आदी उपस्थित होते.