हिवाळ्याच्या गुलाबी थंडीला सुरुवात होताच इरई डॅम, मोहुर्ली, जुनोना, ताडोबा, चारगाव या धरणासह इरई, वर्धा, झरपट या नदीच्या पात्रात स्थलांतरित, तसेच विदेशी पक्ष्यांचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. मोहुर्ली व जुनोना तलावावर तर सकाळच्या वेळी पक्ष्यांचे थवेच्या थवे बघायला मिळत असून पक्षीमित्रांनीही एकच गर्दी केली आहे.
घनदाट जंगल आणि निसर्गरम्य वातावरण असलेल्या या जिल्ह्य़ात निसर्ग निर्मित तलाव आहेत. दरवर्षी हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत या तलावात पक्षांची गर्दी बघायला मिळते. यात प्रामुख्याने जुनोना, मोहुर्ली, ताडोबा, चारगांव, इरई धरण, तसेच इरई, आसोलामेंढा, घोडाझरी, वर्धा व झरपट नद्यांवर स्थलांतरित पक्षांचे मोठय़ा प्रमाणात आगमन होते. यावर्षीही दिवाळी संपताच नोव्हेंबर अखेरीस कडाक्याच्या थंडीला सुरुवात होताच हळूवारपणे स्थलांतरित, तसेच विदेशी पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात झालेली आहे. मोहुर्ली, जुनोरा व इरई धरणाच्या परिसरात युरोप, सायबेरिया, उत्तर व मध्य आशिया आणि लडाख या प्रांतातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून पक्षी येथे आले आहेत. यात प्रामुख्याने चक्रवाक, राजहंस, चमचचोच, पिनटेल, डक, गारगनी, पोच्यार्ड, दॅमझिल कोंच, कारकोचे, तुताारी, शेकाटय़ा या पक्षांचा समावेश आहे. भारतासारख्या उष्ण प्रदेशात हिवाळ्यामध्ये काही काळ हे पक्षी स्थलांतरित होतात. दक्षिणेकडे प्रवास करतांना ते मार्गातील तलावात किंवा जंगलात काही काळ वास्तव्य करतात. अशा या पक्ष्यांचे सर्वाधिक थवे इरई डॅम, मोहुर्ली, जुनोना, ताडोबा, चारगांव या धरणासह इरई, वर्धा, झरपट या नदीच्या पात्रात बघायला मिळतात.
पहाटे व सकाळच्या वेळी तर तलावातील पाण्यावर दूपर्यंत पक्षांचे थवेच थवे बघायला मिळतात. त्यामुळे पक्षीमित्र व निरीक्षक पहाटेपासूनच जुनोना व मोहुर्ली या तलावावर जागा पकडून त्यांचे निरीक्षण करत आहेत. सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाट, त्यांचे वेगवेगळे आवाज ऐकून, निरीक्षण करून पक्षीमित्र अभ्यास करतात. केवळ याच जिल्ह्य़ातील पक्षीमित्र नाहीत तर लगतच्या जिल्ह्य़ातील पक्षीमित्रही तलावाच्या काठावर तासन्तास बसून पक्षांचे निरीक्षण करत आहेत. युरोपातून येणारा ब्लॅक रेड स्टार, रेड थ्रोटेड, फ्लायकॅचर, गुलाबी मैना, शंकर यासारखे पक्षीसुध्दा मोहुर्ली व इरई धरण तलावात दिसून आले आहेत. देशांतर्गत स्थलांतर करणारे रंगीत करकोचे, उघडय़ा चोचीचे करकोचे, राखी बगळे, लहान मोठे पाणकावळे, विविध जातीचे धोबी पक्षी, चांदी, मराळ यासारखे पक्षी सुध्दा तलावाच्या काठावर शांतपणे बसलेले दिसतात. स्थलांतरित पक्षांचा हा आगमनाचा काळ असल्याने आकाशातही पक्षांची गर्दी आहे. साधारणत: जानेवारीच्या शेवटय़ा आठवडय़ापर्यंत मुक्काम केल्यानंतर स्थलांतरित पक्षी निघून जातात. त्यामुळे सध्यातरी या जिल्ह्य़ातील तलावांवर पक्ष्यांचे थवेच्या थवे पाहुणे म्हणून मुक्कामी थांबलेले बघायला मिळत आहेत.