रानोमाळ वाढलेले गवत, शेतात पिके, धुसर पायवाटा..

अरण्य प्रदेशातील साम्राज्यावर धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक वाघिणीस ठार करण्यास संमती मिळाली. मात्र, या प्रयत्नात निसर्गाचीच ढाल आड येत असल्याचा अनुभव वनाधिकारी घेत आहेत. उंच वाढलेले गवत, घनदाट अरण्य, शेतात जोमात आलेले पीक, धुसर झालेल्या पायवाटा, अशी नैसर्गिक स्थिती नरभक्षक वाघिणीसाठी ढाल ठरली आहे. वर्धा जिल्हय़ातील मुक्कामास ७५ दिवस लोटूनही तिच्यावर नियंत्रण ठेवण्यावर किंवा तिला जाळय़ात ओढण्यास वनखात्यास अपयश येत आहे.

चार बळी घेणाऱ्या या वाघिणीची जंगलाशेजारील गावांमध्ये जीवघेणी दहशत पसरली असून गत ५० वर्षांत बोर परिसरात हा असा पहिलाच भीतीग्रस्त अनुभव असल्याचे गावकरी सांगतात. नागपूरचा मुक्काम हलवून वाघीण गुरुवारी रात्री वर्धा जिल्हय़ात उमरविहिरा गावात पोहोचल्याचे तिच्यावर माग ठेवून असलेले वनाधिकारी सांगतात. ७५ दिवसांच्या मुक्कामात वाघिणीने ७०० किलोमिटरचा प्रवास केल्याचे सांगितले जाते. वन्यजीवप्रेमी, शासन व न्यायालयाने वाघिणीस बेशुध्द करीत ताब्यात घेण्याची भूमिका घेतली होती. पण ही ढाल कामात आली नाही. ठार करण्याचा आदेश झाला. पण आता निसर्ग आडवा येत आहे.

गेल्या चार दिवसांपूर्वीपर्यंत पाऊस होता. त्यामुळे रानोमाळ गवत वाढलेले आहे. वाटा निसरडय़ा झाल्या. झाडे घनदाट आहेत. लगतच्या परिसरातील शेतात जोरदार पिके आहेत. पाच फुटापलीकडचे दिसणे अशक्यप्राप्त ठरते. त्यामुळे गोळी चालवणार कुठून आणि कशी हा एक यक्षप्रश्र ठरला आहे. चौथा बळी गेल्यानंतर म्हणजे पंधरवडय़ापूर्वी वाघिणीस बेशुध्द करण्याचे आटोकाट प्रयत्न झाले. आता तर ठार करण्याचा परवाना मिळाला आहे. पण तरीही वाघिणीस जिवंतच पकडून गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या हवाली करण्यास वनाधिकारी प्राधान्य देत आहेत. उपवनसंरक्षक दिगंबर पगार यांनी यास दुजोरा देऊन ठार मारणे हा नाईलाजास्तव शेवटचा पर्याय असल्याची भूमिका मांडली.

वाघिणीचा मागमूस घेत बेशुध्दीचा किंवा ठार करण्याचा अस्त्रप्रयोग वनखात्यासाठी सोपा नाही. त्यातच गावकऱ्यांची संतप्त भूमिका त्यांच्यावर दबाव आणणारी ठरते. वाघिणीची शिकार खात्यासाठी अत्यंत दुर्मीळातील संधी ठरते. ती मिळाली. पण निसर्गाची ढाल घेऊन वावरणाऱ्या वाघिणीच्या जवळ जाणे या संधीला दुरापास्त करीत आहे.