धुळ्यातील दंगलीची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सोमवारी विधानसभेत केली. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्या. श्रीकांत माल्टे यांची चौकशी समिती नेमण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रश्नोत्तराच्या तासाला विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी हा प्रश्न उपस्थित केला. ‘एमआयएम’चे नेते अक्रबुद्दीन ओवैसी यांचे प्रक्षोभक भाषण आणि धुळ्यातील दंगलीचा काही संबंध आहे का, असा प्रश्न खडसेंनी विचारला. त्याला उत्तर देताना पाटील यांनी वरील माहिती दिली. या प्रकरणी आतापर्यंत २४ जणांना अटक करण्यात आली असून, सीआयडी चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 
गेल्या जानेवारीमध्ये झालेल्या या दंगलीमध्ये सहा जणांचा बळी गेला होता.