राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भूतपूर्व प्रचारक व भारत स्वाभिमान चळवळीचे नेते गोविंदाचार्य यांनी रविवारी राळेगणसिद्घी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेउन त्यांच्याशी तब्बल दोन तास चर्चा केली. सुमारे नऊ महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही केंद्र सरकारचे धोरण सामान्य माणसाच्या हिताचे दिसत नाही. त्यासाठी समविचारी लोकांशी विचारविनिमय करून देशभरात नव्याने आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. गोविंदाचार्य यांच्यासोबत मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी हजारे यांची भेट घेतली. लोकपालची अंमलबजावणी, भूमी अधिग्रहण विधेयक मागे घ्यावे, तसेच काळया पैशांबाबतची कार्यवाही या तीन मुद्यांवर हजारे यांनी नुकताच मोदी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पाश्र्वभूमीवर या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.
गोविंदाचार्य यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन आंदोलनाचे कार्यालय, यादवबाबा मंदिर, नापासांचंी शाळा, मीडिया सेंटर, पद्मावती परिसर तसेच पाणलोट क्षेत्र विकास आदींबाबत त्यांनी सखोल माहिती जाणून घेतली. दुपारी एक ते तीनच्या दरम्यान हजारे व  गोविंदाचार्य यांच्यात बैठक झाली. या बैठकीत लोकपाल विधेयकाची अंमलबजावणी, भूमी अधिग्रहण विधेयक, काळा पैसा तसेच ग्रामविकासाबाबत चर्चा झाली. देशाला खऱ्या अर्थाने विकासाच्या वाटेवर न्यायचे असेल तर स्मार्ट सिटी नव्हे तर स्मार्ट व्हिलेज योजना राबविण्याची गरज असल्याच्या मुददयावर उभायतांमध्ये एकमत झाले.  गांधीजींच्या मार्गानेच खरा विकास होऊ शकतो आणि त्यासाठी फुगणारी शहरे व नैसर्गिक साधनसंप्पत्तीचे शोषण थांबवून ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करायला हवे असे हजारे यांनी गोविंदाचार्य यांना सांगितले.
सुरेंद्र बिश्त उपस्थित होते. बैठकीनंतर दोघांनी युरोपमधून आलेल्या ४० महाविद्यालयीन तरूणांशी प्रश्नोत्तराने संवाद साधला. यावेळी विदयार्थ्यांंनी मोदी सरकार, भारत देशासमोरील आव्हाने, भ्रष्ट्राचार विरोधी चळवळ  इत्यादी मुदयावर या तरूणांनी अण्णांशी चर्चा केली.

हजारेंच्या आंदोलनात सहभाग
गोविंदाचार्य यांनी यापूर्वी संघाचे प्रचारक म्हणून काम पाहिले असून त्यांनी हजारे यांची भेट घेऊन समर्थन दिल्याने भाजपासाठी हा धक्का असल्याचे मानले जात आहे. आपण हजारे यांच्या आंदोलनात सहभागी होणार असून मोदी सरकार जनतेला दिलेल्या आश्वासनापासून दूर जात असल्याचे गोिंवदाचार्य यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. हजारे यांनी उपस्थित केलेले प्रश्न हे हजारे यांचे नसून लोकांच्या मनातील प्रश्न आहेत. या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय झाला पाहिजे अन्यथा आंदोलन अटळ असल्याचेही त्यांनी सांगितले.