पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या नांदेडकरांना गुरुवारी पावसाच्या लहरीपणाचा फटका बसला. जिल्ह्यात काही ठिकाणी वादळ-वाऱ्यासह पाऊस झाला. वीज पडून झालेल्या दुर्घटनेत भोकर तालुक्यात तिघांचा, तर हदगाव तालुक्यात महिलेचा मृत्यू झाला.
गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. गुरुवारी जिल्ह्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. भोकर तालुक्यातील वागद येथे माय-लेकराचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला. कौशल्याबाई गणेश वागदकर (वय ३५) व सुदर्शन (वय ७) हे दोघे दुपारी दोनच्या दरम्यान शेताकडे जात असताना अचानक पाऊस सुरू झाला. आश्रयासाठी झाडाखाली थांबले असताना वीज कोसळून दोघांचा जागीच मृत्यू झाला.
आमदरीवाडी येथील गणेश रामदास मेंडके (वय १८) या तरुणाचा वीज अंगावर पडल्याने मृत्यू झाला. गणेश शेताकडे जात होता. या वेळी अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. अंगावर वीज कोसळून तो जागीच ठार झाला. हदगाव तालुक्यात दीर्घ विश्रांतीनंतर आलेल्या पावसाने जांभळा येथे महिलेचा बळी घेतला. चंद्रकलाबाई उत्तम देशमुखे (वय ३२) ही महिला शेतात िनदणीचे काम करीत होती. वीज कोसळल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला तामशाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. अन्य घटनेत हदगाव तालुक्यातील येवली येथे सरस्वतीबाई िशदे (४५) ही महिला अंगावर वीज पडल्याने गंभीर जखमी झाली. तिच्यावर हदगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.