पूर्ती उद्योगसमूहातील कथित संशयास्पद गुंतवणुकीच्या तपासासंदर्भात प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांची गुरुवारी सुमारे चार तास चौकशी केली.
गडकरी यांचा संबंध असलेल्या पूर्ती पॉवर अँड शुगर लिमिटेड कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या विविध फम्र्सचा प्राप्तिकर खाते तपास करत आहे. गेल्या २२ तारखेला या खात्याच्या अधिकाऱ्यांनी पूर्ती समूहाशी संबंधित मुंबईतील ११ फम्र्सच्या कार्यालयांवर छापे घातले असताना या कंपन्या त्या पत्त्यांवर नसल्याचे त्यांना आढळले होते. या प्रकरणात गडकरी हे उद्या, शुक्रवारी प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांसमोर हजर होणार होते, मात्र शुक्रवारी नवी दिल्लीत पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीला हजर राहायचे असल्याने त्यांनी गुरुवारीच हजेरी लावली. प्राप्तिकर खात्याच्या संचालक (तपास) गीता रविचंद्रन यांनी त्यांची यासंदर्भात सुमारे चार तास चौकशी केली.