सुरत-नागपूर महामार्गावरील अकलाड मोराणेलगत शनिवारी सकाळी झालेल्या विचित्र अपघातात चार ठार, तर सहा जण जखमी झाले. एका वाहनाच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या मारुती व्हॅनला समोरून टेम्पोने तर मागून आलेल्या अवजड मालमोटारीने धडक दिली. मृत व जखमी हे धुळे आणि जळगाव जिल्ह्य़ातील रहिवासी आहेत.
साक्रीहून धुळ्याकडे येणाऱ्या मारुती व्हॅन अकलाड मोराणे येथे एका वाहनाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती. यावेळी समोरून बैलगाडी येताना दिसल्याने चालकाने वाहन नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचवेळी समोरून येणाऱ्या टेम्पोची व्हॅनला धडक बसली. याचवेळी मागून अवजड मालमोटार येत होती. त्या चालकाचे नियंत्रण सुटून अवजड मालमोटारीने मारुती व्हॅनला मागून धडक दिली. दोन्ही वाहनांची धडक इतकी जबरदस्त होती की, त्यात मारुती व्हॅनचा चक्काचूर झाला. अपघातात संतोष चंद्रकांत मोरे (२८ मोगलाई, धुळे), व्हॅन चालक महेंद्र पितांबर सोनवणे (३५) संगिता, अर्जुन पुराणिक (३०) आणि पिंटू बाबुलाल देवरे (३०, सर्व रा. नेर, धुळे) हे जागीच ठार झाले. याच गाडीतील छोटू पूनम सोनवणे (३०), भटाबाई सुपडू पुराणिक (३७), सुनिता भाईदास सोनवणे (२५), वसंत जंगलु गायकवाड (४४ सर्व रा. नेर, धुळे), बापूजी बाविस्कर (२२, अकलाड मोराणे) आणि रावण रामराव पाटील (५५, बेहेरगाव, धरणगाव, जळगाव) हे जखमी झाले. या सर्वाना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
अपघातानंतर नागपूर-सुरत महामार्गावर वाहनांची कोंडी झाली. महामार्ग पोलीस व स्थानिक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. अपघातात मृत पावलेला संतोष मोरे हा युवक आरोग्य विभागातर्फे १०८ क्रमांकाने मोफत सेवा देणाऱ्या रुग्ण वाहिकेवरील चालक म्हणून काम करत होता. कुसुंबा प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याची नेमणूक होती. रात्र पाळी करून तो सकाळी धुळ्यातील मोगलाई येथे आपल्या घरी जाण्यास निघाला असताना हा अपघात झाला. अपघातग्रस्त मारुती व्हॅनमध्ये एका शेतकऱ्याची १ लाख १० हजाराची रोख रक्कम मदत करणाऱ्या तरुणांनासापडली. ही रक्कम श्रावण आणि अमोल परदेशी यांनी पोलिसांच्या स्वाधीन केली.