‘नीरी’च्या शास्त्रज्ञाला ‘हायड्रोप्लुम’वर चार पेटंट

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेतील (नीरी) शास्त्रज्ञाने सांडपाण्यातील जैविक घटक वेगळे करणारे तंत्रज्ञान विकसित

ज्योती तिरपुडे, नागपूर | November 21, 2012 6:28 AM

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेतील (नीरी) शास्त्रज्ञाने सांडपाण्यातील जैविक घटक वेगळे करणारे तंत्रज्ञान विकसित करून तब्बल चार पेटंट मिळविले आहेत. शास्त्रज्ञ डॉ. गिरीश पोफळी यांच्या भगिरथ प्रयत्नांना यश येऊन त्यांनी चक्क अमेरिका, युरोप आणि दक्षिण आफ्रिकेबरोबरच ऑस्टेलियामध्ये ‘हायड्रोप्लुम’ (ऌऊफडढछवटए) या तंत्रज्ञानावर चार पेटंट घेतले आहेत. पेटंट प्राप्त करण्याची प्रक्रिया पोफळी यांनी २००४-०५ पासून सुरू केली जवळपास सहा वर्षांनी त्यांच्या प्रयत्नांना यश आले. भारतात अद्याप ‘हायड्रोप्लुम’वर पेटंट मिळायचे असून ती प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय डॉ. गिरीश पोफळी यांची केंद्रीय शहर विकास मंत्रालयाच्या ‘सेंट्रल पब्लिक हेल्थ एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग ऑर्गनायझेशन’च्या मॅन्युअलमध्येही ‘हायड्रोप्लुम’ हे नवीन तंत्रज्ञान म्हणून मान्यता देण्यात आली आहे. विशेष म्हणजे शहर विकास मंत्रालयाचे हे म्यॅन्युअल भारतातील सर्व स्वराज्य संस्थांचे दिशादर्शक म्हणून उपयोगात आणले जाते.
सांडपाणी दोन प्रकारचे असून शकते. त्यात औद्योगिक कारखान्यांतून निर्माण होणारे आणि घरगुती वापरातून निर्माण होणारे सांडपाणी. पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि सांडपाण्याची प्रचंड मात्रा लक्षात घेऊन त्या पाण्याच्या पुनर्वापरावर जगभरात संशोधने सुरू आहेत. दिवसागणिक तंत्रज्ञान अधिक सुलभ, सक्षम आणि किफायतशीर असावे, असा संशोधकांचा प्रयत्न असतो. त्यादृष्टीने पोफळी यांचे संशोधन महत्त्वाचे असून ‘हायड्रोप्लुम’च्या डिझाईनसाठी दोन वर्षांचा कालावधी लागला तर संपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी त्यापेक्षाही जास्त कालावधी लागला. अमेरिका, युरोपमध्ये पेटंट मिळण्याविण्यासाठी अनेक चाळण्यांतून त्यांचे संशोधन गेले आहे. एवढेच नव्हे तर हे पेटंट देताना १९०४ पासूनचा डाटा संबंधित यंत्रणेने तपासून पाहिला तेव्हा ‘नीरी’ला ही पेटंट मिळाली.
जुन्या आणि सध्या वापरात असलेल्या तंत्रज्ञानामध्ये सांडपाण्यातील जैविक घटक(ऑरगॅनिक मॅटर) वेगळे करून त्या पाण्याचा पुनर्वापर करण्याची सोय आहे. सांडपाण्यातील बारीक कण; जैविक घटक एकमेकांना चिटकून त्यांचे वजन वाढून ते खाली बसावेत आणि वर स्वच्छ पाणी मिळवून देण्याचे काम ‘हायड्रोप्लुम’ करते. वरवर साधे वाटणारे हे तंत्र प्रक्रियेदरम्यान अतिशय किचकट होते. कारण विरघळलेले किंवा न विरघळलेले जैविक घटक पाण्यापासून वेगळे करताना जुन्या तंत्रज्ञानात अनेक त्रुटी दिसून येतात. काही ना काही जैविक घटक स्वच्छ पाण्यात शिल्लक राहत. साचलेला गाळ बाहेर काढण्यासाठी पंप हाऊसची वेगळी तजवीज करावी लागायची. त्यामुळे खर्चही वाढायचा. या सर्व त्रुटींवर ‘हायड्रोप्लुम’ने मात केली आहे. तंत्रज्ञान उपयोगात आणताना सांडपाण्यातील जैविक कण एकमेकांवर आदळून त्यांचा वेग कमी होतो. जैविक कण एकमेकांना चिटकून मोठे व जड होतात आणि तळाशी जावून बसतात. असे कण काढून टाकण्याची क्षमता हायड्रोप्लुमची जास्त आहे. नागपूर महापालिका आणि सीएसआयआर-नीरीच्या संयुक्त प्रयत्नांतून नागपुरातील भांडेवाडीत साडेतीन ते चार लाख लीटर सांडपाणी प्रतिदिन स्वच्छ करण्यासाठी हे संयंत्र उभारण्यात येणार आहे.  
त्यासंबंधीची प्रक्रिया सुरू झाली असून ते सहा महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात डॉ. गिरीश पोफळी म्हणाले, सांडपाण्यातून जैविक घटक वेगळे केले म्हणजे पाणी स्वच्छ होते. मात्र, ते पिण्यासाठी उपयोगाचे नाही. त्या पाण्याचा बागकाम, शेती, दुचाकी-चारचाकी धुण्यासाठी, अंगणात पाणी शिंपडण्यासाठी किंवा उद्योगांच्या कारखान्यात ‘कुलिंग टॉवर’साठी उपयोग होऊ शकतो. अमेरिका, युरोप, दक्षिण आफ्रिकेबरोबरच ऑस्ट्रेलियाने ‘हायड्रोप्लुम’चे पेटंट देऊ केले आहे. भारतातही याचे पेटंट घेण्याचे प्रयत्न सुरू असून येत्या सहा महिन्यात पूर्णत्वास जाईल, अशी अपेक्षा आहे. दीड महिन्यांपूर्वी हायड्रोप्लुमची बौद्धिक संपदा हस्तांतरित करण्यासंबंधीची जाहिरात देऊ केली होती. त्याला ठाण्यातील कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. त्यासंबंधीची बोलणी सुरू आहे. इतरही कंपन्यांनी ‘नीरी’कडे पाठपुरावा करायला सुरुवात केली आहे.

First Published on November 21, 2012 6:28 am

Web Title: four patent on hydroplumb
टॅग: Hydroplumb,Niri,Patent