जळकोट येथील जि. प. च्या शाळेतील दहावीच्या परीक्षा केंद्रावर लेखन साहित्याचा आधार घेऊन विद्यार्थी उत्तरे लिहित असल्याचे आढळून आल्यामुळे भरारी पथकाने ४ विद्यार्थ्यांवर बडतर्फीची कारवाई केली.
दहावीचा मंगळवारी बीजगणिताचा पेपर होता. परीक्षा मंडळाच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर बठे पथक तनात केले आहे. भरारी पथकेही नियुक्त केली आहेत. जळकोट येथील जि. प. शाळेतील परीक्षा केंद्रावर शिक्षणाधिकारी डॉ. गणेश मोरे यांच्या पथकाने भेट दिली. प्रा. बी. के. कदम, प्रा. गोमसाळे, व्हिडिओग्राफर वैभव गुरव पथकासमवेत होते. परीक्षा केंद्रात सर्रास कॉप्या सुरू असल्याचे लक्षात आल्याने पथकाच्या सदस्यांनी ज्यांच्याकडे लेखनसाहित्य आहे त्यांनी तातडीने ते जमा करण्याचे आवाहन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांची तपासणी केली असता ४ विद्यार्थ्यांकडे लेखन साहित्य सापडले. यानंतर त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. पथकाच्या प्रमुखांनी परीक्षा मंडळाला दिलेल्या अहवालानुसार तातडीने परीक्षा केंद्राच्या प्रमुखांनाही बदलण्यात येणार असून येथे नवीन केंद्रप्रमुख नियुक्त केला जाणार आहे. या केंद्रावर बठे पथकही यापुढे प्रत्येक पेपरला बदलले जाणार असल्याचे मंडळाचे सचिव सचिन जगताप यांनी सांगितले. लातूर विभागाच्या परीक्षा मंडळाने आतापर्यंत बारावीच्या ४ विद्यार्थ्यांवर परीक्षेस बसू न देण्याची कारवाई केली. दहावीच्या एकूण ५ विद्यार्थ्यांवर पुढील परीक्षेसाठी प्रतिबंध घातला आहे.
हमखास यश देणारे परीक्षा केंद्र म्हणून जळकोटची ख्याती काही वर्षांपासून असल्यामुळे या केंद्रावर परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी उत्सुक असतात. मंगळवारी परीक्षा केंद्राबाहेर मोठय़ा प्रमाणात लेखन साहित्य पुरवणारा जमाव होता. मात्र, बठय़ा पथकाने या प्रकाराकडे कानाडोळा केला असल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. मात्र, प्राप्त झालेल्या अहवालानुसार या केंद्रावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे परीक्षा मंडळाच्या सचिवांनी स्पष्ट केले.