महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक पदाधिका-यांनी आमचे नगरसेवकपद रद्द करून दाखवावेच, असे आव्हान पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या चार नगरसेवकांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिले. दरम्यान, शहरातील राजकीय घडामोडींच्या पार्श्र्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढच्या आठवडय़ात भेटीची वेळ दिली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षादेशाचे पालन न केल्याबद्दन मनसेने मनपातील स्थायी समितीचे सभापती तथा गटनेते गणेश भोसले, किशोर डागवाले, सुवर्णा जाधव व वीणा बोज्जा या चारही नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. या पार्श्र्वभूमीवर बोलताना या चारही नगरसेवकांनी पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व मुंबईतील संपर्कप्रमुख व तत्सम पदाधिका-यांवर जोरदार टीका केली. भोसले व डागवाले यांच्यासह पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय झिंजे, दोन्ही नगरसेविकांचे पती श्रीनिवास बोज्जा व संजय जाधव या वेळी उपस्थित होते.
भोसले म्हणाले, मनपा निवडणुकीनंतरच्या सत्तास्थापनेच्या वेळीच पक्षाने राष्ट्रवादीशी युती करण्याचा निर्णय घेतला होता. तो अडीच वर्षांसाठीच होता. तोच आम्ही महापौरपदाच्या या निवडणुकीतही कायम ठेवला. त्या वेळी दिलेले सर्व शब्दही राष्ट्रवादीने पाळले. मग शिवसेनेला पाठिंबा का द्यायचा, हे पक्षश्रेष्ठींनी स्पष्ट करणे गरजेचे होते. मात्र नगरसेवकांना विश्वासात न घेताच त्यांनी हा निर्णय घेतला. ही पद्धत चुकीची आहे. पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी अभ्यंकर यांनी आमचीही बाजू समजून घेतली असून त्यांनीच पुढच्या आठवडय़ात ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईत बोलावले आहे, अशी माहिती भोसले यांनी दिली.
विभागीय आयुक्तांकडे ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना आघाडी’ आघाडी या नावाने आमच्या ४ जणांच्या गटाची नोंदणी झाली आहे. या आघाडीची घटनाही वेगळी आहे. त्यामुळे स्थानिक पदाधिकारी काहीही म्हणत असतील तरी ते आमचे नगरसवेकपद रद्द करू शकत नाही, असे सांगताना भोसले यांनी त्यांनी आमच्यावर कायदेशीर कारवाई करून दाखवावी, असे आव्हान दिले. स्थानिक पदाधिका-यांनी नेहमीच उलटी भूमिका घेतली, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, गेल्या वेळी आम्ही शिवसेनेला पाठिंबा दिला होता, त्या वेळी हेच पदाधिकारी काँग्रेस आघाडीला पाठिंबा द्यावा यासाठी प्रयत्नशील होते.
डागवाले यांनीही स्थानिक पदाधिका-यांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, यांची कोणाचीही निवडून येण्याची लायकी नाही. त्यांना अनामत रक्कमही वाचवता येत नाही. त्यांनी पक्षसंघटनेचा आढावा द्यावा, पक्षात काय वाढ केली, हे त्यांनी सांगावे, असे आव्हानही त्यांनी दिले. जगताप यांच्या दावणीला पक्ष बांधल्याच्या आरोपाचाही त्यांनी इन्कार केला. पक्षादेश बजावल्याचा प्रचारही खोटा असून आम्हाला हा पक्षादेश मिळालाच नाही, असा दावाही डागवाले यांनी केला.