१०८ क्रमांकाच्या मोफत रुग्णवाहिकांची मदत घ्या!

पुणे : कडक उन्हाचा तडाखा आणि अतिश्रमामुळे काही वेळा व्यक्तीच्या शरीराचे तापमान सामान्य तापमानापेक्षा वाढते आणि उष्माघात होऊ शकतो. असा त्रास झाल्यास राज्यात कुठेही १०८ क्रमांकाच्या मोफत रुग्णवाहिका सेवेची मदत घेता येणार आहे. गेल्या तीन वर्षांत एप्रिल व मे महिन्यात ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सव्‍‌र्हिसेस’च्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांमुळे उष्माघात झालेल्या ४,१२८ रुग्णांना मदत झाली आहे.

मार्च महिना संपतानाच राज्यभरात उकाडा प्रचंड वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमानाच्या पाऱ्याने ४० अंश सेल्सिअसचा टप्पादेखील ओलांडला आहे. विशेषत: दुपारच्या वेळी बाहेर जाणे भाग असलेल्या व्यक्तींना कडक उन्हाच्या झळा अतिशय त्रासदायक ठरत आहेत. अशा परिस्थितीत अत्यावश्यक वैद्यकीय सेवांच्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका सेवा देण्यास सक्षम आहेत, असे ‘बीव्हीजी-एमईएमएस’चे प्रमुख कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी सांगितले. या रुग्णवाहिका सेवेला २०१४ मध्ये सुरूवात झाली. त्या वर्षी या रुग्णवाहिकांनी उष्माघाताच्या १८५ रुग्णांना सेवा दिली, तर २०१५ मध्ये १२५५ आणि २०१६ मध्ये २६८८ उष्माघात रुग्णांना सेवा पुरवण्यात आली.

सध्या या सेवेच्या राज्यात ९३७ रुग्णवाहिका आहेत. डॉ. शेळके म्हणाले,‘‘या रुग्णवाहिकांची सेवा ग्रामीण भागातही उपलब्ध आहे. गेल्या वर्षीपासून विदर्भ व मराठवाडय़ात पालिका, जिल्हाधिकारी कार्यालय व आरोग्य विभागाबरोबर ‘हीट अ‍ॅक्शन प्लॅन’ राबवला जातो. यंदा या आठवडय़ातच त्याला सुरूवात होऊन बैठका घेतल्या जातील.’’

रुग्णवाहिका येण्यापूर्वी

  • व्यक्तीचे कपडे काढून त्वचेस मोकळी हवा मिळू द्या
  • व्यक्तीस थंड ठिकाणी हलवा, थंड पाण्याचा शिडकावा करा. परंतु शरीराचे तापमान अचानक जलदपणे कमी होईल असे करू नका.
  • शरीराला वारा घाला.
  • काखेत व मानेवर बर्फाच्या पिशव्या ठेवा
  • व्यक्तीला बर्फाच्या पाण्यात बुडवू नका. अंग बर्फाने गुंडाळू नका. त्याने उलट उष्माघात वाढू शकतो.
  • बेशुद्धावस्थेतील व्यक्तीस पाणी पाजू नका. कोणतेही औषध देऊ नका.
  • स्नायू किंवा अंग चोळू नका.

 

रुग्णवाहिका केव्हा बोलवाल?

  • व्यक्तीची त्वचा स्पर्शास गरम लागणे व लालसर होणे व खालील लक्षणे दिसणे
  • घामाचे प्रमाण अगदी कमी होणे किंवा घामच न येणे
  • ताप खूप वाढणे
  • व्यक्ती खोल व जोराचा श्वास घेत असेल तर
  • उलटय़ा-जुलाब
  • लघवीचे प्रमाण कमी होणे
  • खूप तहान लागणे
  • गोंधळल्यासारखी स्थिती होणे
  • भोवळ/ अंधारी येणे
  • लकवा/ अपस्मार/ झटके येणे