अगदी थेट रामायण, महाभारतातील बोधप्रद कथांच्या मंत्रापासून तर ठाण्यातील घराघरात शिवसेना पोहोचविणारे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचा महापालिकेतील फुटीरवाद्यांना धडा शिकविणाऱ्या बहुचर्चित ‘खोपकर’ तंत्रापर्यंत.. आज ऐषोराम उपभोगणारे पूर्वी कसे कोण रिक्षाचालक तर कोण पंक्चर काढणारे होते यांची आठवण करून देण्यापासून तर ‘जीव का जाईना शिवसेना’अशी ग्वाही देण्यापर्यंत, सर्व सर्व काही.
एकीकडे इतर पदाधिकाऱ्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश करावा म्हणून जिल्हा दौऱ्याचे नियोजन सुनील बागूल यांनी सुरू केले असताना कोणी फुटू नये म्हणून काळजी घेण्याकरिता आणि शिवसैनिकांना आपलेसे करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने कसे प्रयत्न करण्यात येत आहेत, त्याची झलक रविवारी शालिमार येथील कार्यालयात पक्षाचे सचिव विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या संघटन मेळाव्यात पाहावयास मिळाली.
बागूल यांची हकालपट्टी आणि त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश या प्रकरणानंतर शिवसेनेची ही पहिलीच संघटनात्मक बैठक वा मेळावा होता. पक्ष सचिवांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असल्याने त्याबद्दल सर्वानाच उत्सुकता होती. अपेक्षेप्रमाणे बागूल यांच्या हकालपट्टीचा संदर्भ जुन्या व नवीन पदाधिकाऱ्यांच्या भाषणात येत गेला. दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे पक्षप्रमुख जयंत दिंडे यांनी ग्रामीण भागाच्या परिस्थितीची आणि पक्षासाठी केलेल्या आणि कराव्या लागणाऱ्या उपायांची योग्य मांडणी करत सुरू झालेला ही बैठक नंतर मात्र भावनिक मुद्दय़ांवरच अधिक घसरली. जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी ‘जीव का जाईना शिवसेना’अशी ग्वाही देत पक्षासाठी आतापर्यंत स्वत: केलेल्या कामाची जंत्री मांडताना नेत्यांपेक्षा कार्यकर्ते किती महत्त्वपूर्ण आहेत हे सांगताना रामकृष्ण परमहंस यांनी दिलेल्या दाखल्याचा आधार घेतला. त्यात रामायणात लक्ष्मणाचे जे महत्त्व आहे, ते कार्यकर्त्यांचे असल्याचे ते म्हणाले. करंजकर यांचे निरूपण सुरू असताना कार्यालयात मागील बाजूस उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांची चुळबूळ सुरू झाली. हे लक्षात घेत करंजकर यांनी पुन्हा एकदा जीव का जाईना शिवसेना हा मुद्दा आळवीत शिवसेनेविरोधात कार्यरत असणाऱ्यांचा प्रसंगी खोपकर करू, असा इशारा दिला. माजी जिल्हाप्रमुख विनायक पांडे आणि दत्ता गायकवाड यांनी बागूल प्रकरणाचा उल्लेख करत आपण त्यांना भरपूर समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु ते त्यांच्या नातेवाईकांच्या आग्रहास बळी पडल्याचे नमूद केले. शिवसेनेमुळेच आपण घडलो. आपण पूर्वी भाडय़ाची रिक्षा चालवीत होतो, तर आताचे मनसेचे आमदार वसंत गिते पूर्वी सायकलींचे पंक्चर काढत, याची आठवणही पांडे यांनी करून दिली. राष्ट्रवादीतील गटबाजीचाही त्यांनी उल्लेख केला.
विनायक राऊत यांनी बागूल प्रकरणापासून राहुल गांधी यांची काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड होईपर्यंतच्या सर्व विषयांना हात घालत शिवसैनिकांच्या टाळ्या मिळविण्याचा प्रयत्न केला. करंजकर यांच्याप्रमाणे त्यांनीही रामायणातील उदाहरण दिले. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या अन्त्ययात्रेतील विराट जनसमुदायाचे वर्णन करताना अर्जुनाला श्रीकृष्णाने घडविलेल्या विराट दर्शनाचे उदाहरण दिले. शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्या व हकालपट्टी केलेल्यांना राष्ट्रवादी पक्ष प्रवेश देत असल्याविषयीचा जळफळाट व्यक्त करताना राष्ट्रवादीला कार्यकर्ते घडविता येत नसल्याने ते अशा तयार कार्यकर्त्यांना पक्षात घेत असल्याची टीका त्यांनी केली. राष्ट्रवादी हा बेइमानांचा पक्ष असून अशा पक्षात बाटग्यांना काय किंमत राहील, असा सवालही त्यांनी केला. राहुल गांधी हे अपयशी असल्याने त्यांच्यावर आजपर्यंत पक्षाने जी जबाबदारी सोपविली, त्या प्रत्येक वेळी पक्षाला अपयश पत्करावे लागले.
त्यामुळे ते उपाध्यक्ष झाल्याने पक्षाला फारसा उपयोग होणार नाही, असे भाकीतही राऊत यांनी वर्तविले. या बैठकीस आ. धनराज महाले, महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, गटनेते अजय बोरस्ते, महिला आघाडीच्या सत्यभामा गाडेकर यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.