साहित्य संमेलननगरीत ‘साहित्य सागरातील कोकणची रत्ने’ असा एक मोठा बॅनर लावण्यात आला होता. कोकणातील साहित्यिकांची नावे या फलकावर लिहिण्यात आली आहेत.  ज्येष्ठ साहित्यिक व संमेलनाध्यक्ष निवडणुकीतील एक उमेदवार ह. मो. मराठे यांचे नाव वगळण्यात आले आहे. कोकणच्या रत्नांची नावे लिहिलेल्या या फलकावरून हमोंचे नाव वगळण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
 ‘हमों’चा जन्म व बालपण मालवण तालुक्यातील, त्यामुळे हमोही साहित्य सागरातील कोकणच्या अनेक रत्नांपैकी एक ठरतात. त्यांची ४० हून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. अशा साहित्यिकाला केवळ आकसातून वगळण्यात आल्याची चर्चा येथे सुरू होती.
संमेलनात स्थानिक कवींना स्थान नाही
साहित्य संमेलन आणि निमंत्रित व नव्याने लिहित्या झालेल्या कवींसाठी असलेले काव्यसंमेलन हे अलिखित समीकरण झाले आहे. प्रत्येक साहित्य संमेलनात ते असतेच. चिपळूणच्या साहित्य संमेलनात झालेल्या कवी संमेलनात स्थानिक कवींना स्थान न मिळाल्याबद्दल स्थानिक साहित्यिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
‘खुले अधिवेशन’
 नाव वगळले
साहित्य संमलेनाच्या समारोपप्रसंगी विविध ठराव मंजूर करण्यात येतात. या ठरावांचे जाहीर वाचन होऊन हात उंचावून त्याला अनुमोदन घेतले जाते. संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेत या सत्राचा ‘खुले अधिवेशन’ असा ठळकपणे उल्लेख करण्यात येत असतो.
 चिपळूणच्या संमेलनातील पत्रिकेत फक्त ‘समारोप समारंभ’ असा उल्लेख करण्यात आला असून येथे ‘खुले अधिवेशन’ हे नाव वगळण्यात आले आहे. खुल्या अधिवेशनात संमत करण्यात येणाऱ्या ठरावांचे पुढे काय होते, असा प्रश्न नेहमीच साहित्यप्रेमींना पडतो. निमंत्रण पत्रिकेतून ‘खुले अधिवेशन’ असा शब्दप्रयोग वगळल्याने हे ठराव निर्थकच असतात, त्याला महत्त्व कशाला द्यायचे, असा ‘सुज्ञ’ विचार महामंडळ व संयोजन समितीने केला, असेच दिसून येत आहे.