संमेलनात शुक्रवारी रात्री गायिका मृदुला दाढे-जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मराठी गाण्यांचा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमास संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे संपूर्ण वेळ उपस्थित होते. त्यांनी रसिकतेने गाणी ऐकली आणि स्वत:च्या आवडीच्या काही गाण्यांची खास फर्माईशही केली. कार्यक्रमाच्या निवेदिका मंगला खाडिलकर यांनी आम्ही तटकरे साहेबांनी गाण्यांची जी फर्माईश केली आहे ती पूर्ण करीत असल्याचे सांगितले आणि त्यांनी फर्माईश केलेली ‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे जरतारी हे वस्त्र मानवा तुझीया आयुष्याचे’ आणि ‘कळेना माझे मला असा मी काय गुन्हा केला’ ही गाणी सादर करीत असल्याचे सांगितले. जलसिंचनावरील काढण्यात आलेली श्वेतपत्रिका, त्यावरून उठलेले वादळ हा संदर्भ चाणाक्ष श्रोत्यांच्या मनात ताजा झाला आणि तटकरे यांनी आपल्या मनातील व्यथा या फर्माईशीच्या माध्यमातून व्यक्त केली की काय, अशी चर्चा उपस्थितांमध्ये सुरू झाली.
* अद्ययावत मीडिया सेंटर
संमेलनासाठी इलेक्ट्रॉनिक व मुद्रित माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी अद्ययावत असे मीडिया सेंटर उभारण्यात आले आहे. दहा डेस्कटॉप कॉम्प्युटर, सात लॅपटॉप, चार राऊटर्स, स्वत:चा जनरेटर बॅकअप, २० अ‍ॅम्पीअर स्टॅबिलायझर, कॅननचे लॅनमध्ये चालणारे कॉपीअर, प्रिंटर व झेरॉक्स असे मशीन, १६ एमबीपीएसच्या ४ लाइन्स, २ राऊटर्स, ५ वायफाय कनेक्शन येथे आहेत. रिअलचा स्पीड १.२ एमबीपीएस इतका आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठी व त्यांना मदत करण्याकरिता विक्रम निमकर व त्यांचे चौदा सहकारी येथे ठाण मांडून बसले आहेत.
* संमेलन झाले महाउत्सव
रत्नागिरी जिल्ह्य़ात तब्बल २२ वर्षांनी होत असलेल्या या संमेलनाबाबत कितीही वाद उठले तरी कोकणाच्या अर्धशहरी आणि ग्रामीण भागात त्याबद्दल मोठे कुतूहल होते. कालपासून इथे उसळत असलेल्या गर्दीवरून तेच अधोरेखित झाले आहे. संमेलनाच्या मंडपात होणाऱ्या कार्यक्रमांना तर रसिकांचा उत्तम प्रतिसाद आहेच, पण त्याहीपेक्षा मंडपाबाहेरची सजावट आणि प्रकाशयोजना पाहण्यासाठी जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातून मोठय़ा संख्येने गर्दी जमत आहे. इथे आयोजित करण्यात आलेले ग्रंथप्रदर्शन, तसेच खाद्यपदार्थाच्या स्टॉल्सवरही मोठी वर्दळ आहे, त्यामुळे हे केवळ मराठी साहित्य संमेलन राहिलेले नाही, तर साहित्य संस्कृतीचा महाउत्सव झाला आहे.
* अस्तित्वात नसलेले खेडे
प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी संमेलन परिसरात उभारलेले कोकणातील खेडे इथे येणाऱ्या रसिकांसाठी मोठे आकर्षण झाले आहे. देसाईंनी इथे विविध आकारांच्या झोपडय़ा उभ्या केल्या आहेत, पण तशा झोपडय़ा कोकणात शोधाव्याच लागतील, अशी परिस्थिती आहे. झोपडय़ांच्या भोवतीचे बांबूंच्या तुकडय़ांचे कुंपण तर इथल्या निसर्गाच्या दृष्टीनेही गैरसोयीचे, त्यामुळे हा निव्वळ एखाद्या चित्रपटातला सेट वाटतो. कोकणाच्या समाजजीवनाची झलक त्यातून व्यक्त होत नाही. अशा या देखाव्याचा खर्च मात्र झाला आहे फक्त ४० लाख रुपये.
*  राजकारण्यांपासून सुटका?
साहित्य संमेलनांचे व्यासपीठ आणि कार्यक्रमांत राजकारण्यांची वाढती रेलचेल असल्याच्या मुद्यावरून निर्माण झालेला वाद मिटला असला तरी ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगीच राजकारण्यांचे संमेलनातील वर्चस्व दिसून आले.  साहित्य संमेलनात राजकारणी आले तर बिघडले कुठे, असा सवाल उद्घाटक शरद पवार यांनी शुक्रवारी संमेलनाच्या उद्घाटनानंतरच्या भाषणात केला. मात्र त्याचे प्रत्यंतर याच कार्यक्रमात आले. कारण उद्घाटनप्रसंगी मावळते संमेलनाध्यक्ष वसंत आबाजी डहाके आणि या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले या दोनच साहित्यिकांना व्यासपीठावर स्थान होते. बाकीच्या खुच्र्या सर्व राजकारण्यांनीच काबीज केल्या होत्या. त्यामुळे मधु मंगेश कर्णिक आणि उत्तम कांबळे हे दोन माजी संमेलनाध्यक्ष प्रेक्षकांमध्येच बसले होते. कार्यक्रमाच्या आखणीनुसार शरद पवारांना त्यांचे भाषण दहा मिनिटांत आटोपते घेणे क्रमप्राप्त होते. मात्र त्यांनीच पन्नास मिनिटे भाषण केले. त्यामुळे खुद्द संमेलनाध्यक्ष कोत्तापल्ले यांना भाषणातील महत्त्वाचे मुद्दे सांगून आटोपते घ्यावे लागले.  संमेलनाचा उद्घाटनाचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी गाजवला असला तरी समारोपप्रसंगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती अनिश्चित मानली जात आहे. त्यामुळे या वेळी तरी संमेलनाध्यक्ष डॉ. कोत्तापल्ले यांना मनसोक्त फटकेबाजी करता येईल, अशी अपेक्षा आहे.