शेतीसह निसर्गातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा योग्य उपयोग केल्यास देशाची इंधनाची गरज मोठय़ा प्रमाणात भागेल, असा विश्वास ख्यातनाम संशोधक आणि ‘आरती’ संस्थेचे संस्थापक संचालक डॉ. आनंद कर्वे यांनी व्यक्त केला. दरम्यान कोळशापासून लोखंड निर्मितीच्या तंत्राबाबत सखोल अभ्यासाची गरजही त्यांनी मांडली.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आणि ‘पेम’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसऱ्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या राधाबाई शेटय़े सभागृहात डॉ. कर्वे यांच्या हस्ते झाले. यावेळी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अॅड. विलास पाटणे, वसुंधरा महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीरंग कद्रेकर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, पेम संस्थेचे अध्यक्ष सतीश कामत, वसुंधरा क्लबच्या सुप्रिया चित्राव, एक्सेल इंडस्ट्रीजचे सिनियर मॅनेजर सुरेश पाटणकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी रिफ्लेक्शन्स आणि सॅन्चुरी एशिया मासिकातील सर्वोत्तम छायाचित्रांच्या प्रदर्शनाचेही उद्घाटन डॉ. कर्वे यांच्या हस्ते झाले.
‘त्याज्य शेतामालापासून पेट्रोलियमला पर्याय’ या विषयावर दृकश्राव्य माध्यमातून मार्गदर्शन करताना डॉ. कर्वे म्हणाले, आपल्या देशात दहा कोटी टन खनिज तेल परदेशातून आयात होते आणि त्यासाठी ७५ अब्ज डॉलर मोजावे लागतात. हे परकीय चलन वाचवण्यासाठी शेतीसह निसर्गातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा योग्य उपयोग करुन खनिजतेलाची निर्मिती करता येणे शक्य असून त्यामुळे देशाची इंधनाची गरज मोठय़ा प्रमाणात भागेल. इंधन निर्मितीसाठी लागणाऱ्या कचऱ्याला उसाचा भाव मिळू शकेल. त्यासाठी आरती संस्थेने पर्यावरणपूरक शेगडय़ा तयार केल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस तयार करण्याचे तंत्र मोठय़ा प्रमाणात वापरले जाते. पंरतु त्यावर कोणाचा विश्वासच नव्हता. मात्र जागतिक स्तरावरील ‘अॅश्नेड’ पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर मात्र लोकांनी त्यावर विश्वास ठेवून त्याचा वापरही सुरु केला आहे. रासायनिक खतांची पिकांसाठी कोणतीही गरज नसल्याचेही डॉ. कर्वे यांनी स्पष्ट केले.
दोन डिसेंबपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘उपहारगृहातील विघटनशील पदार्थाचे व्यवस्थापन’ या विषयावर डॉ. दर्शन देशपांडे यांचे व्याख्यान झाले, तर ‘जस्ट अ मिनट’ ही शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. सायंकाळी ५ वाजता पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पार पडला. छायाचित्रकार चारुदत्त नाखरे, कृषितज्ज्ञ डॉ. दिलीप नागवेकर आणि भारतीय पर्यावरण शास्त्र व तंत्रज्ञान संस्था, रत्नागिरी यांचा जिल्हाधिकारी राजीव जाधव व अन्य मान्यवरांच्या हस्ते ‘वसुंधरा मित्र’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.