सरकारी शाळेतील शिक्षकाच्या नियुक्तीसाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात मुलांचा वर्ग भरवूनही भोगलवाडीकर ग्रामस्थांना शिक्षक मिळण्यास तयार नाही. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या गोंधळलेल्या कारभाराने काही शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक, तर काही शाळांमध्ये शिक्षकच नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, प्रशासकीय यंत्रणा शिक्षकांच्या नियुक्त्या दुरुस्त करायला तयार नाही. त्यामुळे शिक्षकासाठी भोगलवाडीच्या ग्रामस्थांवर खेटे मारण्याची वेळ गुदरली आहे.
जि.प. शिक्षण विभागाचा कारभार टीकेचा विषय झाला आहे. शिक्षकांच्या सोयीसाठी अधिकाऱ्यांनी नियम बासनात गुंडाळून कोणाला कुठेही नियुक्तीचे आदेश देण्याचा विक्रम केला. धारूर तालुक्यातील भोगलवाडी हे ऊसतोड मजुरांचे गाव. गावात पहिली ते दहावीपर्यंत शाळा. तब्बल ३१ पदे मंजूर. पण सध्या ११ शिक्षकांवरच कारभार सुरू आहे. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे. शाळेत उर्वरित शिक्षकांची त्वरित नियुक्ती करावी, यासाठी ग्रामस्थांनी थेट गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शाळा भरवली. तत्कालीन शिक्षणाधिकारी भास्कर देवगुडे यांनी लेखी पत्र देऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते, मात्र देवगुडे सेवानिवृत्त झाले. जुलैचा पहिला आठवडाही उलटला, पण भोगलवाडीकरांना शिक्षक मिळालेच नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांनी जि.प. अध्यक्ष अब्दुल्ला, शिक्षण सभापती संदीप क्षीरसागर यांची नुकतीच भेट घेतली. क्षीरसागर यांनी निवेदन स्वीकारून रिक्त जागा भरण्याचे आश्वासन दिले.