महानगरपालिकेच्या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने नगर शहरातील अनेक वैद्यकीय व्यावसायिक सुखावले आहेत. शहरातील रुग्णालयांच्या विरोधातील हीच कारवाई अंतिम टप्प्यात असतानाच विधिमंडळात झालेल्या घोषणेने या कार्यवाहीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना कोणते निकष निश्चित केले जातात, यावर शहरातील रुग्णालयांच्या अनधिकृत बांधकामांचे भवितव्य ठरेल.
मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेने नगर शहरातील अनेक बांधकाम व्यावसायिकांबरोबरच वैद्यकीय व्यावसायिकही सुखावले आहेत. दंड भरून अनधिकृत बांधकामे अधिकृत होऊ शकतील, अशी आशा आता निर्माण झाली आहे. मनपाने शहरातील तब्बल १७५ खासगी रुग्णालयांवर अनधिकृत बांधकाम, मंजूर आराखडय़ाप्रमाणे नसलेले बांधकाम, वाहनतळाच्या जागेचा व्यावसायिक वापर अशा कारणांसाठी कारवाई सुरू केली आहे. या वैद्यकीय व्यावसायिकांना मनपाने नोटिसा दिल्या असून त्यावर सुनावणीही झाली आहे. यातील अनेक रुग्णालयांचे म्हणणे मनपाने अमान्य केले असून, या १७५ रुग्णालयांवर अनधिकृत बांधकामांबाबतची कारवाई अंतिम टप्प्यात आहे. त्याने अनेक डॉक्टरांचे धाबे दणाणले होते.
अशातच अशी बांधकामे अधिकृत करण्याचे धोरण जाहीर झाल्याने वैद्यकीय व्यावसायिक सुखावले आहेत. मात्र मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिका क्षेत्रातील अशा बांधकामांची वर्गवारी ठरवण्यात येणार असून, त्यानुसार निकष निश्चित करून त्याच्या आधारेच ही बांधकामे अधिकृत ठरवली जाऊ शकतील. यात हे निकषच महत्त्वाचे असून त्यानंतरच पुढची कार्यवाही होईल. मात्र शहरातील बहुसंख्य रुग्णालयांमध्ये वाहनतळाच्या जागेचा गैरवापर हा समान मुद्दा असून, मुख्यमंत्र्यांच्या घोषणेप्रमाणे कार्यवाही झाली तरी त्यात वाहनतळाचा मुद्दा डोळय़ांआड केला जाणार नाही. त्यावर कारवाई होण्याचीच दाट शक्यता व्यक्त होते.
सावेडी रस्त्याकडेही लक्ष!
एका याचिकेतील निर्णयानुसार मनपाने सावेडी रस्त्यावरील इमारतींचेही वर्ष, दीड वर्षांपूर्वीच सर्वेक्षण केले आहे. त्यात पत्रकार वसाहत चौक ते सावेडी नाका या हमरस्त्याच्या कडेला सुनोर १८७ इमारतींमध्ये अनधिकृत बांधकामे आढळून आली आहेत. मनपाने याही लोकांना नोटिसा दिल्या आहेत. मात्र उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर हे सर्वेक्षण झालेले असतानाही त्यावर पुढे कोणतीच कार्यवाही झालेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या ताज्या घोषणेमुळे याहीबाबतीत काय होते, याकडे अनेकांचे लक्ष आहे.