घटनास्थळावर स्फोटके, शस्त्रास्त्रे व नक्षल साहित्य जप्त

एटापल्ली तालुक्यातील गुंदम ते सेवारी दरम्यानच्या जंगलात झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दोन्ही महिला नक्षलवादी असल्याची ओळख पटली असून कसनसूर नक्षल दलम उपकमांडर निर्मला उर्फ सविता धुर्वे (२५,रा. नैनगुडा) व सहएरिया समिती सदस्य आरती उर्फ सीताई बिसरू पुडो (३०,रा. रानकट्टा) यांचा खात्मा करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. या दोन्ही महिला नक्षलवाद्यांवर १२ लाखांचे बक्षीस होते.

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील या चकमकीत घटनास्थळावरून मोठय़ा प्रमाणात स्फोटके, शस्त्रास्त्रे व इतर नक्षल साहित्य जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे, मृत नक्षल आरती ही नक्षलवाद्यांच्या उत्तर गडचिरोली विभागाचा सचिव जोगन्ना याची दुसरी पत्नी असल्याने गडचिरोली जिल्ह्य़ातील चळवळीला जबर हादरा बसला आहे. आरही २००० मध्ये एटापल्ली दलममध्ये भरती झाली होती. तिच्यावर गडचिरोली जिल्ह्य़ातील विविध पोलिस ठाण्यात खून, जाळपोळ, स्फोट घडवून आणणे, अपहरण, घातपात, खुनाचे प्रयत्न यासह इतर ८० गुन्ह्य़ांचा समावेश आहे. तिच्यावर ६ लाखांचे बक्षीस होते. त्याचबरोबर कसनसूर नक्षल दलम उपकमांडर निर्मला २००२ मध्ये नक्षल दलममध्ये भरती झाली होती. तिचा पोलिस व सामान्यांचे खून, जाळपोळ, अपहरण, स्फोट घडवून आणणे, घातपात, खुनाचे प्रयत्न यासह इतर ४० गुन्ह्य़ांमध्ये तिचा समावेश होता. तिच्यावरही ६ लाखांचे बक्षीस होते.

या चकमकीनंतर घटनास्थळाचा शोध घेतला असता दोन नक्षल मृतदेहांबरोबच १ नग ३०३ रायफल, १ नग १२ बोअर रायफल, १ नग क्लेमोर माईन व स्फोटके, ७ नग ३०३ जिवंत काडतुसे, ९ नग १२ बोअर जिवंत काडतुसे, १ नग मस्केट, विंत काडतूस १ नग, ३०३ खाली केस, १ नग १२ बोअर खाली केस, ४ नग पिट्ट, १ नग औषध पेटी, १ नग कॅमेरा फ्लॅश, १ नग ३०३ रायफलचे बटप्लेट व मोठय़ा प्रमाणावर नक्षल साहित्य सापडले. दरम्यान, २०१६ या वर्षांच्या सुरुवातीपासून पोलिसांनी नक्षल्यांचा बिमोड करण्याच्या उद्देशाने योजनाबध्द पावले उचलत आतापर्यंत १७ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, ६ नक्षलवाद्यांना अटक व ४ नक्षल्यांना ठार केले आहे. त्यामुळे या जिल्ह्य़ातील नक्षल चळवळ खिळखिळी होत आहे.