संगीता मडावी या मुलीच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या टोळीने पाच महिन्यांत किमान १३ मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाचा मागोवा घेऊन सर्वत्र तपास पथकाच्या माध्यमातून शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
गडचिरोली येथे वनरक्षकपदाच्या भरतीकरिता जाऊन गायब झालेली हेमलकसा येथील संगीता मडावी (२२) या तरुणीबाबत भामरागड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या संदर्भात तपास करीत असताना तपासाची दिशा तिच्याशी लग्न ठरलेल्या मनोज सडमेक या वनरक्षकाकडे जात होती. यासंदर्भात अधिक तपास केला असता मनोजविरुध्द संगीताला पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तत्पूर्वी आरोपी मनोजने सत्र न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामिनाकरिता अर्ज केलेला होता. त्यामुळे त्याच्याकडे तपासाचा रोख नव्हता. गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढून व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासून सत्र न्यायालयात त्याबाबत पुरावा सादर करून आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यावर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे संगीता मडावीबाबत कसून तपास करता मनोज सडमेक यांने वनरक्षक माधुरी वट्टी हिच्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून तिच्याशी लग्न करता यावे म्हणून संगीता मडावी हिचा काटा काढण्याचे ठरविले. त्याचप्रमाणे त्याचे मित्र मनोज मडावी, मारुती वेलादी, एकनाथ ईस्टाम, प्रमोद वेलादी यांच्या मदतीने कासमपल्ली येथील जंगलात नेऊन तिचा सर्वाच्या मदतीने गळा दाबून खून केला व मृतदेह वनविभागाच्या लाकडाच्या ढिगावर ठेवून जाळून टाकून पुरावे नष्ट केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
त्यावरून कासमपल्ली जंगल परिसरात अभियान राबवून आरोपीचे गुन्ह्य़ातील इतर साथीदार मनोज मडावी, मारुती वेलादी, एकनाथ ईस्टाम, प्रमोद वेलादी यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. या व्यतिरिक्त इतर मुलींना फूस लावून गुन्हे केले काय, याबाबत आरोपीकडे सखोल विचारपूस करून अधिक तपास चालू आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक राहुल श्रीरामे, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रवींन्द्र पाटिल, सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत चौधरी, पोलिस उपनिरीक्षक कांबळे, ठाकरे, पोहवा, बारसागडे, पोना, डोनारकर, दीपक कदम, सचिन शिंदे, अनिल सुकारे, विशाल झाडे, पंकज मोहुर्ले यांनी केली.