युवा शक्तीला खिंडार, भाजप नेत्यांनाही धक्का
येत्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या नगर पालिकेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून गडचिरोलीच्या नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने भाजप आमदार बंटी भांगडीया यांच्या युवा शक्ती संघटनेला खिंडार पडले आहे.
मुंबईतील ‘शिवालय’ या शिवसेनेच्या मुख्यालयात पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे व गडचिरोलीचे जिल्हा संपर्क प्रमुख आनंद जाधव यांच्या उपस्थितीत उॉ. अश्विनी धात्रक यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, जिल्हा परिषद सदस्या छाया कुंभारे, उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम, भरत जोशी, नीलकमल मंडल, युवासेनेचे जिल्हा प्रमुख चंदू बेहरे, रामकिरीत यादव व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. २०११ मध्ये झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत युवा शक्ती संघटनेचे १३ नगरसेवक निवडून आल्याने या संघटनेची सत्ता प्रस्थापित झाली. त्यानंतर १८ सप्टेंबर २०१५ रोजी डॉ. अश्विनी धात्रक नगराध्यक्ष झाल्या.
याच सुमारास पदाधिकाऱ्यांशी मतभेद झाल्याने सुरेंद्रसिंह चंदेल यांनी शिवसेनेत पुनप्र्रवेश केला. मात्र, त्यावेळी एकही नगरसेवक त्यांच्यासोबत शिवसेनेत गेला नाही. आता पूर्वाश्रमीच्या युवा शक्ती संघटनेचे नगरसेवक भाजप की कॉंग्रेस, अशा संभ्रमात असतांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुरेंद्रसिंह चंदेल यांनी चक्क नगराध्यक्षांनाच शिवसेनेत प्रवेश घडवून सर्वावर मात केली आहे, यामुळे येथील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. डॉ. अश्विनी धात्रक यांच्या प्रवेशानंतर नगरसेविका सुषमा राऊत, देसाईगंजच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका कल्पना माडावार व दुबे हेही शिवसेनेत दाखल झाल्यामुळे यापुढे अन्य काही नगरसेवकही शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेऊन भाजपवर निशाणा साधतील, असे बोलले जात आहे. दरम्यान, गडचिरोलीत भाजपचा पालकमंत्री, खासदार व दोन आमदार असतांनाही धात्रक यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतल्याने भाजप नेत्यांनाही चांगलाच धक्का बसला आहे.