गडचिरोली येथील शिष्यवृत्ती गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी दिगांबर मेंडके यांची कारागृहातून जामिनावर सुटका होताच ते फरार झाले असून इतर सहा गुन्ह्य़ात पोलिस त्यांचा शोध घेत आहेत, तर याच घोटाऴ्शी संबंधित मनोजकुमार मून, प्रीतमसिंह बघेले व दिगंबर राठोड हे तीन लेखाधिकारीही फरार झाल्याने खळबळ उडाली आहे.
गडचिरोली येथे समाजकल्याण विभाग व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत विविध संस्थांचा २५ कोटींचा शिष्यवृत्ती घोटाळा उघडकीस आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. गडचिरोलीचे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी या गैरव्यवहार प्रकरणी विविध संस्थांचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापकांसह समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त तुकाराम बरगे, लिपिक विजय बागडे, संजय सातपुते, एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी दिगांबर मेंडके व इतर १९ जणांना अटक केली होती. या सर्वानी न्यायालयात धाव घेतली. दरम्यानच्या काळात बरगे, बागडे व सातपुते यांच्यावर याच प्रकरणातील इतर सहा गुन्हे दाखल करून त्यांना पुन्हा अटक करण्यात आली, तर प्रकल्प अधिकारी मेंडके यांना न्यायालयाने जामीन देताच त्यांची कारागृहातून सुटका झाली. दरम्यानच्या काळात मेंडके यांच्यावर याच प्रकरणी आणखी सहा गुन्हे दाखल झाले. त्यामुळे पोलिस त्यांना अटक करण्यासाठी गेले असता मेंडके फरार झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या संदर्भात अधिक माहितीसाठी पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता मेंडके १० जूनपासून फरार असल्याची माहिती त्यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली. इतर सहा गुन्ह्य़ात मेंडके गडचिरोली पोलिसांना हवे असल्याने गडचिरोलीचे एक पथक त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी गेले असता तेथून ते फरार असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या घरी केवळ मुलगी राहात असून मेंडके पत्नीसह फरार असल्याचे सांगण्यात आले. गडचिरोली पोलिस आता मेंडके यांचा कसून शोध घेत आहेत.
दरम्यान, या शिष्यवृत्ती प्रकरणात लेखा अधिकारी मनोजकुमार मून, प्रीतमसिंग बघेले व दिगंबर राठोड यांची नावे समोर येताच हे तीन अधिकारी सुध्दा फारर झाले असून जामिनासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पाटील यांनी दिली. मनोजकुमार मून हे नागपूरला कार्यरत होते, तर प्रितमसिंह बघेल पोलिस ट्रेनिंग स्कूल अकोला येथे कार्यरत आहेत. २०११ ते २०१३ पर्यंत बघेल गडचिरोली एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात लेखाधिकारी होते. त्यांच्याच काळात हा सर्व गैरप्रकार झाल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे आता पोलिसांनी फरार झालेल्या या सर्वाचा शोध सुरू केला आहे. प्रत्यक्षात मेंडके यांना कार्यालयात नियमित हजेरी लावायची होती. मात्र, फरार झाल्यापासून ते कार्यालयात हजेरी लावायलाही येत नसल्याची माहिती पाटील यांनी दिली.
तिकडे संस्थाचालक शहबाज हैदर यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केलेला आहे, तर संस्थाचालक भरत टोकलवार व त्याच्या दोन्ही पत्नी भाग्यलक्ष्मी व वैशाली टेभुर्णे याही फरार आहेत. या सर्वाचा शोध गडचिरोली स्थानिक गुन्हे शाखा घेत आहेत.