राज्यभरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु असताना धुळे जिल्ह्यात गणेश मंडळाच्या छताखाली जुगाराचा डाव मांडल्याचे समोर आले. कापडणे गावात गणेश मंडळाच्या मंडपात जुगाराचा डाव मांडणाऱ्या ५ जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरोधात सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कापडणे येथे मंगळवारी रात्री सव्वा एकच्या सुमारास ही मंडळी गणेशोत्सवासाठी उभारलेल्या मंडपात जुगार खेळत होती.

महात्मा फुले मैदानात नवीन गणपती मंडळात जुगाराचा डाव रंगल्याचे गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना आढळून आले. याप्रकरणी मधुकर नारायण माळी, ईश्‍वर रामदास माळी, बापू नवल माळी, अनिल गंगाराम माळी आणि भिमराव किसन माळी (सर्व रा.कापडणे) यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडून ५ हजार ७३० रुपये जप्त केले. याप्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.