लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तटस्थ राहण्याचा निर्णय नगर व शिर्डी मतदारसंघात घेतला असला तरी, भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांनी शेवटच्या क्षणाला मनसेच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी मंगळवारी सकाळी मनसेच्या कार्यालयात जाऊन जिल्हा संघटक सचिन डफळ यांची भेट घेतली. दोघांची बंद खोलीत चर्चा झाली. मात्र निवडणुकीत तटस्थ राहण्यावर मनसे ठाम असल्याचेच डफळ यांनी स्पष्ट केले.
मनसेचे शहरात ४ नगरसेवक आहेत. त्यांनी महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेला पाठिंबा दिला आहे. चार महिन्यांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत मनसेचे नगरसेवक किशोर डागवाले यांना गांधी यांची भूमिका मदत करणारी ठरली होती. मात्र हाच मुद्दा भाजप व सेना या युतीमध्ये वादाचाही ठरला होता.
राज्यात इतरत्र मनसे काही जागा लढवत असली तरी नगर व शिर्डीमध्ये पक्षाने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे पदाधिकारी कोणत्याही उमेदवाराच्या प्रचारात दिसले तर कारवाईचा इशारा पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी दिल्याचे डफळ यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. गांधी यांच्या भेटीसंदर्भात डफळ यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, मनसेच्या कार्यालयातच हनुमान मंदिर आहे. आज हनुमान जयंतीनिमित्त गांधी दर्शनासाठी आले होते, त्यांची व माझी भेटही झाली. त्यांनी सहकार्य करण्याची विनंती केली, त्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिका-यांशी संपर्क साधावा, असे सांगितले, परंतु त्याबाबत आपण असमर्थता व्यक्त केली व पक्षाचा निर्णय तटस्थ राहण्याचा आहे, असे स्पष्ट केले.