नगर शहरात शुक्रवारी मंगलमूर्ती विघ्नहर्त्यांचे वाजतगाजत, गुलाल उधळत, ‘गणपती बाप्पा मोरया’चा घोष करत जल्लोषात स्वागत करण्यात आले. किरकोळ सरी वगळता पावसानेही दिवसभर विश्रांती घेत श्रीगणेशाच्या स्वागतात अडथळा आणला नाही. शहरातील मोठय़ा तरुण मंडळांनी सायंकाळनंतर प्रतिष्ठापनेच्या जोरदार मिरवणुका काढल्या. मिरवणुकांतून ‘डीजे’ची क्रेझ कमी झाल्याचे व ढोल पथकांची क्रेझ वाढली आहे. तरीही काही मंडळांनी मिरवणुकीत कर्णकर्कश डीजेचा वापर केलाच.दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. घराघरांतून सकाळी विधिवत ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना करण्यात आली. सकाळी अकरानंतर शहरातील सर्वच प्रमुख रस्ते गजबजून गेले होते. माळीवाडा, गांधी मैदान, चितळे रस्ता, दिल्लीगेट, प्रोफेसर कॉलनी चौक भागातील स्टॉलवर गणेशमूर्ती घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. मागील दोन वर्षे शहरात मूर्तीचा काहीसा तुटवडा जाणवला. यंदा मात्र मूर्तिकारांकडील मूर्ती शिल्लक राहिल्याचे सांगितले जाते. याच परिसरात जिल्हय़ाच्या विविध भागांतील ढोलताशांची पथके ‘सुपारी’ घेण्यासाठी दाखल झाली होती. विसर्जन मिरवणुकीत सहभागी न होणाऱ्या मंडळांनी प्रतिष्ठापनेच्या मिरवणुका जोरदारपणे काढल्या.नगरचे ग्रामदैवत माळीवाडा विशाल गणेश मंदिरात ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात, जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम व त्यांच्या पत्नी पुनीत यांच्या हस्ते गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तालयोगी पथकाने ढोलवादन केले. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी स्वागत केले. विश्वस्त विजय कोथिंबिरे, ज्ञानेश्वर रासकर, बाबासाहेब सुडके, सुरेश खरपुडे आदींसह भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.दुपारी बालमंडळांनी मिरवणुका काढल्या. सावेडी, भिंगार, केडगाव उपनगरांतूनही मिरवणुका निघाल्या. सायंकाळी मोठय़ा मंडळांच्या मिरवणुका निघाल्या. नगर अर्बन बँकेच्या गणेशाची सनई चौघडय़ाच्या निनादात व ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. खासदार दिलीप गांधी, ज्येष्ठ संचालक सुवालाल गुंदेचा आदी सहभागी झाले होते. बँकेचे कर्मचारी गणवेषात उपस्थित होते. चौपाटी कारंजावरील विक्रांत गणेश मंडळाने आपल्या लौकिकाला साजेशी पारंपरिक पद्धतीने, सोवळय़ाच्या पालखीतून मिरवणूक काढली. मिरवणुकीत अग्रभागी घोडय़ांवर आरूढ झालेल्या तरुणी, सनई चौघडा, बाल कार्यकर्त्यांचे ढोल पथक, बाल भजनी मंडळ, बँड पथक, गोंधळी समूह सहभागी होते. मंडळाने शनिवारी (दि. ६) सामूहिक अथर्वशीर्ष पठण आयोजित केले आहे.सातभाई गल्ली मित्रमंडळाच्या मिरवणुकीत फेटे घातलेल्या महिलांचा सहभाग लक्षणीय होता. महिलांचे लेझीम पथक, लहान मुलांचे ढोल पथक होते. मंडळाने उद्या, शनिवारी गणेश याग आयोजित केला आहे. पटवर्धन चौकातील शिववरद प्रतिष्ठानने ‘तालयोगी’ ढोल पथकांची आकर्षक मिरवणूक काढली. धनगरवाडीतील जयमृदंग वारकरी शिक्षण संस्थेतील ४० बाल वारकरींचे पथकही तसेच स्थायी समिती सभापती किशोर डागवाले सहभागी होते. सांगळे गल्लीतील सन्मित्र मित्रमंडळापुढेही ढोल पथक होते. दाळमंडई फाऊंडेशन ट्रस्टनेही ढोल पथकांसह मिरवणूक काढली. या मिरवणुकीत महापौर संग्राम जगताप, नगरसेवक सुवेंद्र गांधी सहभागी झाले होते. तोफखाना भागातील जंगूभाई तालीम ट्रस्ट, तेलीखुंट परिसरातील मंडळाने डीजेचा दणदणाट करत मिरवणूक काढली. गुलालाचा वापर कमी झाला. डीजेची क्रेझ कमी, ढोल पथकांची वाढली. बहुसंख्य मंडळांच्या सायंकाळीच मिरवणुका. मिरवणुकांमध्ये महिलांचा सहभागही वाढला. जंगूभाई तालीम मंडळाची मिरवणूक खामकर चौकातून जाताना पोलिसांची संरक्षक फळी. डीजेचा आवाज कमी ठेवण्यासाठी पोलिसांच्या पथकांकडून वारंवार सूचना. प्रमुख रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे वाहतूक कोंडी.