प्रवासी महिलांना गाडीत घेऊन लुटणा-या गुन्हेगारी टोळीला जेरबंद केले असून त्यांच्याकडून १३ गंभीर प्रकारचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या टोळीकडून ४७० ग्रॅम वजनाचे १३ लाख रुपये किंमतीचे दागिने व गुन्ह्यासाठी वापरलेली दोन वाहने असा २० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, ही माहिती शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली.
जिल्ह्यामध्ये महामार्गावर तसेच इतरत्र प्रवासी महिलांना गाडीत घेऊन लुटण्याच्या गुन्ह्यात लक्षणीय प्रमाणात वाढ झाली होती. त्याची दखल घेऊन पोलिस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे  पो.नि. अनिल देशमुख यांना तपास करण्याची सूचना केली. या पथकाने उस्मानाबाद,बीड परिसरात जाऊन पंधरवडाभर चिकाटीने तपास केला. त्यांनी एका बोलेरो (एमएच १७ एजे १७०९) या गाडीचा पाठलाग करुन तुकाराम उर्फ नाना बाबू मुंडे (वय २९ रा. भोगलेवाडी ता. धारुर जि. बीड), आक्का तुकाराम मुंडे (वय ३७), राम बहिरी इटकर (वय २१ रा. सोनारी ता. परांडा) यांना पकडले. त्यांनी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अंबप फाटय़ावर एका प्रवासी महिलेस गाडीत घेऊन तिचे दागिने व मोबाईल काढून घेतल्याचा गुन्हा केल्याचे कबूल केले. या प्रकरणात त्यांना गोकुळ तुकाराम इटकर व साधू आत्माराम ढिगारे (रा. सोनारी) यांनी मदत केल्याचे कबूल केले. या सर्वाना १४ ऑगस्ट रोजी अटक करुन वडगांव न्यायालयात हजर केले असता २५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली.
हे सर्व आरोपी अट्टल गुन्हेगारी वृत्तीचे असल्याने त्यांच्याकडून तपासासाठी सहकार्य मिळत नव्हते. त्यामुळे पथकाने साधू ढिगारे हा इंदापूर पोलिस ठाण्यात अटक असलेला आरोपी व गोकुळ इटकर यालाही बुधवारी अटक केली. त्यांच्याकडे गुन्ह्यांची अधिक माहिती घेतली असता त्यांनी ईश्वर चंद्रकांत दुबळे (रा. सोनारी), नजीर व पप्पी (पूर्ण नांवे नाहीत) यांच्या समवेत कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यात सुमारे १२ ठिकाणी गुन्हे केल्याचे कबूल केले.