कणकवलीत महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पाच जणांना अटक झाली. अटकेतील संशयित राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने विरोधी पक्षाच्या लोकांनी धिक्कार केला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कणकवली पोलीस ठाण्यात मोर्चा नेऊन पोलीस निरीक्षक सीताराम शेवाळे यांना निवेदन सादर केले. अत्याचार प्रकरणातील संशयितांना दयामाया दाखवू नका तसेच राजकीय दबावाला बळी पडू नका असे पोलिसांना आवाहन केले.

भाडय़ाची खोली दाखविण्याच्या बहाण्यातून १५ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यान तर १७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर २९ वर्षीय पीडित महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची फिर्याद दाखल होताच कणकवली पोलिसांनी पाच जणांवर अटकेची कारवाई केली.
कणकवली येथील स्वप्निल सुभाष पाटील (२४), वैभव चंद्रकांत मालंडकर (२४), रमेश विष्णू पावसकर (३२), बंडय़ा ऊर्फ कृष्णा भरत नाईक (३६), मयूर विश्वनाथ चव्हाण (२६) या पाच जणांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता २५ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणी रमेश पावसकर व कृष्णा नाईक यांच्यावर बलात्काराचा तर अन्य तिघांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. या २९ वर्षीय महिलेच्या पतीचे निधन झाल्यावर ती मुलीसोबत भाडय़ाच्या खोलीत राहत होती. तिला घरमालकाने खोली सोडण्यास सांगितली. त्यानंतर ती भाडय़ाच्या खोलीच्या शोधात होती.
खोली शोधत असताना बंडय़ा नाईक याने तिला फोन करून बसस्थानकानजीक बोलावून घेतले. तेथे खोली शोधण्याचा बहाणा करून एका हॉटेलच्या पाठीमागील घरात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर दुसऱ्यांदा तसा प्रकार घडला.
या अत्याचारित महिला आणि तिच्या नातेवाईकांना धमकीही देण्यात आली. पण पीडित महिलेने पोलीस ठाण्यात जाऊन सारा प्रकार पोलिसांना सांगताच कारवाई झाली. राजकीय पक्षाशी संबंधित संशयित असून एका लोकप्रतिनिधीचे नातेवाईक असल्याचे बोलले जात आहे.