वाडा येथील खरवली (कोहज) गावात राहणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर रविवारी रात्री एका चौकडीने सामूहिक बलात्कार केला असून या फरारी चौकडीचा वाडा पोलीस शोध घेत आहेत.
ही मुलगी लघुशंकेसाठी गेली असता, चौघांनी तिच्या तोंडात बोळा कोंबून तिला जवळच्या शेतात नेले व तेथे तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिच्या पायावर विटांनी मारहाण करून तिला जखमी केले. त्यात ती बेशुद्घ झाली. सोमवारी सकाळी कुटूंबियांनी तिचा शोध सुरू केला असता, ती शेतावर बेशुद्घ अवस्थेत सापडली. वाडा ग्रामीण रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पिडीत मुलीने दिलेल्या तक्रारीवरून वाडा पोलिसांनी रविंद्र मुकणे व त्याच्या अन्य तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
दोन मुलींचा विनयभंग
ठाणे : भिवंडी तसेच मुंब्रा भागात दोन मुलींचा विनयभंग झाला असून या दोन्ही घटनांमधील  दोन आरोपींना अटक झाली आहे.
भिवंडीत गायत्रीनगरात राहणाऱ्या सात वर्षीय मुलीला वडील बोलवित आहेत, असे सांगून शकील सलीम पठाण (२५) या तिच्या वडिलांच्या मित्राने तिला कोंबडपाडा येथील पाण्याच्या टाकीजवळ नेले व तिचा विनयभंग केला. या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी शकीलला अटक केली आहे. मुंब्रा भागात राहणारी एक युवती शाळेतून घरी परतत असताना विशाल सकपाळ (२४) याने तिला अडवून तिला प्रेमाची मागणी घातली असता, तिने नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या विशालने तिला शिवीगाळ करू न तिचा विनयभंग केला. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी विशालला अटक केली आहे.