तालुक्यातील नगरसूल येथील विवाहितेवर सरपंचासह तिघांनी बलात्कार केल्या प्रकरणी येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका संशयितास पोलिसांनी अटक केली. संबंधित महिलेने यापूर्वी स्थानिक पोलिसांकडे दाद मागितली होती. परंतु, त्याचा कोणताही उपयोग झाला नव्हता. पोलीस अधीक्षकांकडे दाद मागितल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.
येवला तालुक्यातील नगरसूल येथील २२ वर्षीय विवाहितेने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार फिर्याद दिली आहे. घरगुती कलहातून मार्ग काढावा, यासाठी ही महिला सरपंच प्रमोद पाटील यांच्याकडे सल्ला व मदत मागण्यास गेली होती. परंतु, हा सल्ला
महागात पडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तीन महिन्यांपूर्वी पीडित महिला नगरसूल येथील ग्रामीण रुग्णालयात लहान मुलांच्या उपचारासाठी गेली होती. त्यावेळी सरपंच प्रमोद पाटील, संतोष (सोन्या) गंडाळ आणि किरण तांगडे हे तिला येवला शहरातील एका हॉटेलवर घेऊन गेले. लहान मुलास गाडीतच किरण तांगडेकडे सोपविले. त्यानंतर दोघांनी बलात्कार केला. या घटनेनंतरही संशयितांकडून वारंवार मागणी होऊ लागल्याने त्रस्त होऊन पीडित महिलेने स्वत:चे घर सोडून नातेवाईकांकडे आसरा घेतला. या घटनाक्रमानंतर महिनाभरापूर्वी पीडित महिलेने स्थानिक पोलिसांकडे गाऱ्हाणे मांडले. परंतु, त्याची दखल घेण्यात आली नाही. यामुळे अखेर या महिलेने पोलीस अधीक्षक प्रविण पडवळ यांच्याकडे तक्रार अर्ज केला. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांनी येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर एका संशयितास अटक करण्यात आली आहे. इतर दोन संशयितांसह संबंधीत महिलेला त्रास देणाऱ्या इतर संशयितांचाही शोध सुरू असल्याचे पोलीस उपअधीक्षक सुनील कडासने यांनी सांगितले. बलात्काराच्या गुन्ह्यात सरपंचाविरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.