नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या आश्रमशाळेतील इयत्ता बारावीच्या आदिवासी विद्यार्थिनीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार सुरगाणा तालुक्यातील पळसन येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. या घटनेबद्दल खुद्द आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून परस्परविरोधी माहिती दिली जात आहे. चार दिवसांपूर्वी आश्रमशाळेतून बेपत्ता असणाऱ्या या विद्यार्थिनीविषयी हरविल्याची तक्रारही देण्यात आलेली नव्हती. यावरून आदिवासी विकास विभागाने या घटनेकडे किती गांभिर्याने पाहिले ते स्पष्ट होते. एवढेच नव्हे तर, या विभागाने असा प्रकारच घडला नसल्याची भूमिका घेत प्रसार माध्यमांनी तो रंगविल्याचे खापर फोडून हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी अटक झालेल्यांमधील एक जण माकपचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जाते. परिणामी, राजकीय व स्थानिकांच्या दबावामुळे या घटनेला वेगवेगळा संदर्भ जोडून संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात आहे. पळसन गावातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील ही विद्यार्थिनी आहे. रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. आश्रमशाळेच्या वसतीगृहात ५५० विद्यार्थ्यांसाठी केवळ १६ शौचालये आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांना परिसरात नैसर्गिक विधीसाठी जावे लागते. ही विद्यार्थिनी मैत्रिणीसोबत दुपारी नैसर्गिक विधीसाठी गेली असताना बलात्कार झाल्याचे सांगितले जाते. संशयितांनी घेरल्यानंतर तिच्या मैत्रिणीने आश्रमशाळेत धाव घेतली. बलात्कारीत मुलीस एका गुराख्याने आश्रमशाळेत आणून सोडले. परंतु, पालकांचे म्हणणे वेगळेच आहे. ती सायंकाळी सात किलोमीटर अंतरावरील असणाऱ्या आपल्या गावी निघून आली. रविवारी व सोमवारी तिने या घटनेबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. तिसऱ्या दिवशी बहिणीला तिने हा प्रकार कथन केला. त्यानंतर पालकांनी आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयात तक्रार केली. त्या ठिकाणी जाबजबाब नोंदवून घेण्यात आल्याचे पालकांनी सांगितले. तक्रार करू नये म्हणून ‘मामा’ नामक व्यक्तीकडून दबाव येत होता. परंतु, अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी अखेर तक्रार दिल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले. या प्रकरणी सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने चार संशयितांना अटक केली.