महापालिकांना दररोज छायाचित्रासह अहवाल देण्याचे निर्देश

शहरातून दररोज संकलित होणारा १६० टन कचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण करण्याची कार्यवाही १ मेपासून महापालिका हाती घेणार आहे. शासनाने आता ओला-सुका कचरा वेगवेगळा संकलित करून त्याचे वर्गीकरण केल्यावरच तो कचरा डेपोत टाकण्याची ताकीद दिली आहे. त्यासाठी १ मेपासून विशेष मोहीम सुरू केली जाणार आहे. या मोहिमेंतर्गत कचऱ्याचे वर्गीकरण करण्याच्या प्रक्रियेची छायाचित्रासह माहिती शासनाकडे नियमित पाठवावी लागणार आहे.

शहरातील विविध भागांतून रोज सुमारे १६० टन कचरा जमा होतो. तो जमा करण्यासाठी पालिकेने २७ घंटागाडय़ांची व्यवस्था केली आहे. प्रत्येक घंटागाडीवर एक कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. पाच कंदील बाजार हॉटेल, मंगल कार्यालये येथे वेगळ्या घंटागाडय़ा आहेत. तसेच महापालिकेचे सफाई कर्मचारी रोज विविध भागांत जाऊन स्वच्छता करतात. नंतर जमा झालेला कचरा विविध वाहनांमध्ये जमा केल्यावर वरखेडी रोड परिसरात असलेल्या कचरा डेपोत टाकण्यात येतो. या कचऱ्यात प्लास्टिक, दोरी, खोके, कागद, गटारींचा गाळ, सडका भाजीपाला, भंगार साहित्य आदींचा प्रामुख्याने समावेश असतो.

घराघरांतून जमा झालेला ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे जमा केला जातो. पूर्वी हा कचरा एकत्रितपणे वरखेडी रस्त्यावरील कचरा डेपोत टाकण्यात येत होता. काही दिवसांपासून ओला कचरा वेगळा करून गांडूळ खत प्रकल्पात टाकण्यात येतो. त्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यात येत आहे. मात्र ओला-सुका कचरा पूर्णपणे वेगवेगळा करून तो कचरा डेपोत टाकण्याची प्रक्रिया प्राथमिक स्वरूपातील आहे. सद्य:स्थितीत घंटागाडय़ांत ओला कचरा घेण्यासाठी ड्रम ठेवण्यात आले आहेत. त्यात शिळे अन्न, कापलेल्या उरलेल्या भाज्या, बगिचांतील पालापाचोळा टाकण्यात येतो. ओला- सुका कचऱ्याचे वर्गीकरण करूनच तो कचरा डेपोत टाकला जावा यासाठी शासनाने १  मेपासून कचरा वेगवेगळा संकलित करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच त्याची माहिती छायाचित्रासह शासनाकडे नियमितपणे पाठवावी लागणार असल्याचे सांगण्यात आले. नंतर कचऱ्यावर कशा पद्धतीने प्रक्रिया करावयाची यासाठी शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.