शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात एका वकिलास मारहाण करणाऱ्या मुद्रांक विक्रेत्याने माफीनामा लिहून दिल्यावर उभयपक्षी उद्भवलेल्या वादावर पडदा पडला असला तरी या मारहाणीच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान सर्वसामान्यांना झळ बसणारी घटना घडली. या कार्यालयाचे कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुसऱ्या एका वकिलाने खरेदीसाठी आलेल्या निरपराध पक्षकाराच्या अंगावर धावून जात मानगूट पकडण्यापर्यंत मजल गाठण्याचा प्रकार घडला. या सर्व प्रकारामुळे येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील सुरक्षा किती धोक्यात आली आहे व तेथील प्रशासकीय धोरण किती बोटचेपे आहे, यावर प्रकाश पडत असून तेथील एकूणच कार्यपद्धतीमुळे भरडल्या जाणाऱ्या सर्वसामान्य जनतेत संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.

शहर व तालुक्याच्या लोकसंख्येनुसार येथे दुय्यम निबंधकांची तीन कार्यालये असून येथील न्यायालयासमोरील शेतकी संघाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर शेजारी-शेजारी ही तीनही कार्यालये आहेत. त्यातील दुय्यम निबंधक क्रमांक-१ या कार्यालयात शनिवारी सकाळी एक वकील मालमत्तेच्या नोंदणीसाठी आले होते. त्याच वेळी एक मुद्रांक विक्रेताही तेथे नोंदणी करण्यासाठी आला. नोंदणी करताना कोणाचा क्रमांक आधी यावरून या दोघांमध्ये वाद झाला. त्याचे पर्यवसान अधिकाऱ्यांसमोरच मुद्रांक विक्रेत्याने वकिलास मारहाण करण्यात झाले. त्यावर संतप्त झालेल्या अन्य वकिलांनी संबंधित मुद्रांक विक्रेत्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करत अधिकाऱ्यांना घेराव घातला.

या गदारोळामुळे या कार्यालयाचे कामकाज बंद पडले तरी शेजारी असलेले दुय्यम निबंधक क्रमांक-२ या कार्यालयाचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू होते. तेथे ८० वर्षांच्या वृद्धेचे खरेदीखत नोंदणीचे काम सुरू असताना आलेल्या एका उत्साही वकिलाने तेथील कामकाज रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या वृद्धेसोबत असलेले साक्षीदार व अन्य लोकांमध्ये अशा प्रकारे काम बंद पाडणे योग्य नाही, अशी कुजबुज सुरू झाली. त्यावर हा वकील भडकला. एका वकिलास मारहाण झाली हे समजत नाही का, अशी दरडावणी करीत अंगावर धावून गेलेल्या या वकिलाने साक्षीदाराची थेट मानगूट पकडली. अन्य लोकांनी मध्ये पडत या वकिलाच्या तावडीतून साक्षीदाराची सुटका केली. अन्य आंदोलक वकिलांनी झाल्या प्रकाराबद्दल या साक्षीदाराकडे दिलगिरी व्यक्त केली. मानगूट पकडणाऱ्या वकिलानेही माफी मागितली.

दरम्यानच्या काळात वकील व मुद्रांक विक्रेता वाद पोलीस ठाण्यात गेला. तेथे उभयपक्षी समझोता होऊन प्रकरणावर पडदाही पडला; परंतु दुय्यम निबंधक कार्यालयात घडलेल्या या दोन्ही घटनांवरून अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. कर्मचारी-अधिकाऱ्यासंमोर मारहाणीचे प्रकार घडूनही तेथील प्रशासनाने बोटचेपी भूमिका का घेतली, तसेच या सर्व प्रकारामुळे एका कार्यालयाचे दोन व दुसऱ्या कार्यालयाचे एक तास कामकाज बंद पडल्याने दस्तनोंदणीसाठी आलेल्या पक्षकारांना हकनाक ताटकळत बसावे लागले.