तुळजापूर तीर्थक्षेत्र रेल्वेने जोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रेल्वे कृती समितीमार्फत शिष्टमंडळासह भेट घेणार आहे. कोणत्याही स्थितीत सोलापूर ते उस्मानाबाद हा मार्ग रेल्वेने जोडलाच पाहिजे, याचा पुनरुच्चार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केला.
तुळजापुरात नगरपालिकेच्या वतीने प्रभाग चारमधील विकासकामांचा प्रारंभ झाला. त्याप्रसंगी आमदार पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार नरेंद्र बोरगावकर होते. नगराध्यक्षा जयश्री कंदले, युवक नेते विनोद गंगणे, माजी उपनगराध्यक्ष दिलीप गंगणे, शहराध्यक्ष राजामामा भोसले, संतोष परमेश्वर यांची उपस्थिती होती. नगराध्यक्षा कंदले यांनी स्वागत केले. विविध विकासकामांसह नागरी सुविधा केंद्राचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार पाटील यांनी पालिकेच्या कारभाराबाबत समाधान व्यक्त केले. पालिकेला वीजपुरवठा करण्यास येणाऱ्या अडचणींबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांना या अधिवेशनात भेटून ५ कोटी ७० लाख रुपये वीजबिल माफ करण्याची विनंती करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. माजी आमदार बोरगावकर यांनी विकासकामांसाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. मुख्याधिकारी डॉ. राजीव बुबणे, उपनगराध्यक्ष गणेश कदम यांची उपस्थिती होती. महेंद्र कावरे यांनी सूत्रसंचालन केले.