ताशी सत्तर किलोमीटर वेगाने वाहणारे अतिथंड वारे, उणे तीस ते चाळीस तापमान आणि विरळ वातावरण या साऱ्या आव्हानांना भेदत त्या तिघांनी २९०३५ फुटांची उंची गाठली आणि त्या सर्वोच्च शिखराचा माथाही गहिवरला! ‘गिरिप्रेमी’च्या आनंद माळी, गणेश मोरे आणि भूषण हर्षे या तिघांची ही यशोगाथा, ज्याने सर्वोच्च शिखर ‘एव्हरेस्ट’वर उमटली पुन्हा एकदा मराठी मुद्रा!
‘गिरिप्रेमी’च्या आशिष मानेने कालच ‘ल्होत्से’ शिखर सर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ‘एव्हरेस्ट’चेही यश मिळाल्याने एकाच मोहिमेत आठ हजार मीटरपेक्षा उंच दोन शिखरे सर करण्याचा विक्रम ‘गिरिप्रेमी’च्या नावावर जमा झाला आहे.  ‘एव्हरेस्ट-ल्होत्से’ मोहिमेत उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली गणेश मोरे, आनंद माळी, भूषण हर्षे, आशिष माने, टेकराज अधिकारी आणि अजित ताटे हे सहभागी झाले आहेत.
गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास माळी, मोरे आणि हर्षे यांनी अंतिम चढाईस सुरुवात केली. ताशी सत्तर किमी वेगाने वाहणारे अतिथंड वारे, उणे चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान या साऱ्या आव्हानांना भेदत या तीन वीरांनी रात्रभर चढाई करत बरोबर सकाळी आठ वाजता एव्हरेस्टच्या त्या उत्तुंग शिखरावर तिरंगा आणि भगवा फडकवला. 
वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा सांघिक यशास प्राधान्य – झिरपे
साऊथ कोलपर्यंत पोहोचल्यानंतर ‘एव्हरेस्ट’चे लक्ष्य कोणालाही टाळता येणे अशक्य आहे, मात्र प्रतिकूल हवामान लक्षात घेऊन मी माझ्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा अन्य सहकाऱ्यांचे एव्हरेस्टचे स्वप्न साकार करण्यास प्राधान्य दिले म्हणूनच मी एव्हरेस्टच्या अंतिम चढाईतून माघार घेतली, असे एव्हरेस्ट मोहिमेचा नेता उमेश झिरपे याने सांगितले. झिरपे म्हणाला, गतवर्षी भूषण हर्षे, आनंद माळी व गणेश मोरे यांचे एव्हरेस्टचे स्वप्न अगदी थोडक्यात हुकले होते, त्यामुळेच यंदा त्यांना प्राधान्य देण्याचे ठरविले होते. प्राणवायूचा साठा व प्रतिकूल हवामानात लागणारा प्राणवायू हे लक्षात घेऊन कोणीतरी एकाने माघार घेणे आवश्यक होते. त्यामुळे माझ्या तीन सहकाऱ्यांना अंतिम चढाईची संधी दिली व मी कॅम्प दोनवर परत आलो.