अग्रलेख वाचावा असे ‘लोकसत्ता’ एकमेव वृत्तपत्र; शरद पवार यांचे गौरवोद्गार

पूर्वीच्या काळी वृत्तपत्रातील अग्रलेख विचार करायला लावत. गोविंद तळवलकरांच्या ‘हे राज्य पडावे ही श्रीं ची इच्छा’ हा अग्रलेख वाचून आम्ही उद्योग केला आणि राज्य पाडले. महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणाचे वर्णन आणि दिशा देणारे अग्रलेख लिहिले जात असल्याने कोण काय लिहितात, याची उत्सुकता असे. मात्र अलीकडच्या काळात ‘पेज थ्री’ला महत्त्व आले आहे. प्रमुख इंग्रजी दैनिकांतही अग्रलेखाची जागा अन्य बातम्यांनी भरलेली असते. समाजाला दिशा देण्याचे काम ज्या अग्रलेखातून होते त्याचाच अभाव आता जाणवू लागल्याची खंत व्यक्त करीत मराठीत आता अग्रलेख वाचावा असे ‘लोकसत्ता’ हेच एकमेव वृत्तपत्र असल्याचे  माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी नमूद केले.

delhi farmer protest marathi news, trolley times newspaper marathi news, trolley times newspaper delhi farmers protest marathi news
ना ऑफिस, ना प्रेस… ट्रॅक्टरमधून निघणारं जगावेगळं वृत्तपत्र…
selfie parent letter cm eknath shinde
सेल्फीस नकार देत पालकाने मुख्यमंत्र्यांना केला थेट सवाल; काय आहे प्रकरण? जाणून घ्या
Suresh Wadkar on Pm Narenra Modi
‘साईबाबा आणि देवी-देवतांनी मोदींची नेमणूक केली’; सुरेश वाडकर म्हणाले, “आता सगळं काही…”
Naxalists support for farmers movement
नक्षलवाद्यांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, शत्रूसारखी वागणूक देणाऱ्या सरकारला धडा शिकवा; पत्रकाद्वारे आवाहन

बीड येथे यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात सोमवारी जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने या वर्षीचा (स्व.) स. मा. गग्रे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांना शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार रजनी पाटील, माजी मंत्री सुरेश धस, आमदार जयदत्त क्षीरसागर, अमरसिंह पंडित, आर. टी. देशमुख, भीमराव धोंडे, लक्ष्मण पवार, संगीता ठोंबरे, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित, सभापती संदीप क्षीरसागर, स्वागताध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, संयोजक संतोष मानूरकर, वसंत मुंडे आदी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रातील पत्रकारितेला मोठा इतिहास आहे. स. मा. गग्रे यांनी मराठी पत्रकारितेला दिशा देण्यासाठी आयुष्य वेचले. पत्रकारितेबद्दल विचार करतो तेव्हा माझ्या सुरुवातीच्या काळात अग्रलेख वाचावा, असा आग्रह असे. नवा काळ, नवशक्तिमधील व गोविंद तळवलकर यांचे अग्रलेख महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांना, राजकारणाला दिशा देणारे असत. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना तळवलकर यांनी ‘हे राज्य पडावे ही श्रीं ची इच्छा’ असा अग्रलेख लिहिला. त्यातून आम्ही बोध घेऊन सुंदरराव सोळंके, सुशीलकुमार शिंदे व दत्ता मोघे यांच्या मदतीने सरकार पाडले. त्यानंतर तळवलकरांनी ‘वेगात दौडले आठ मराठे’ असा अग्रलेख लिहिला. त्या वेळी संपादकांचे लिखाण वाचावे असे होते. एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या संपादकांशी झालेल्या चर्चेचा संदर्भ देत शरद पवार म्हणाले, आता काळ बदलला आहे. ‘पेज थ्री’ला महत्त्व आल्याने अनेक मोठय़ा दैनिकांमध्ये अग्रलेखाची जागा इतर बातम्यांनीच भरलेली असते. समाजाला दिशा देण्याचे काम ज्या संपादकीय लेखणीतून होणे आवश्यक आहे. त्याचाच अलीकडे अभाव आहे. मराठीत सध्या अग्रलेख वाचावे असे एकमेव ‘लोकसत्ता’ हे वृत्तपत्र असल्याचे त्यांनी सांगितले. संपादक गिरीश कुबेर यांनी पहिल्यांदा जागतिक स्तरावरील तेलाच्या अर्थकारणाचा विषय मांडला. जागतिक मंदीच्या चमत्कारिक काळाचे अत्यंत वस्तुनिष्ठ विश्लेषण कुबेर यांनी केले. अमेरिका निवडणुकीचे सोप्या भाषेत त्यांनी केलेले चित्रणही वाचकप्रिय झाले, असे गौरवोद्गार पवार यांनी काढले.

दिवंगत गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांनी अत्यंत छोटय़ा गावातून राज्य पातळीवर आपले नेतृत्व उभे केले. ही साधी गोष्ट नव्हती. मुंडेंशी राजकीय विरोध होता; पण वैयक्तिक मैत्री होती. असे सांगून सत्ता नसताना अडचणीच्या काळात या जिल्ह्याने कायम आपल्याला साथ देण्याचे दातृत्व दाखवल्याचेही त्यांनी नमूद केले.

सत्काराला उत्तर देताना गिरीश कुबेर म्हणाले की, मराठवाडय़ाने अनंत भालेराव यांच्यासारखे अनेक बुद्धिजीवी पत्रकार राज्याला दिले. त्याच वाटेवर जात गोविंदराव तळवलकर आणि नरहर कुरुंदकरांच्या प्रेरणेने मी पत्रकारिता करत आहे. पत्रकारिता करायची असेल तर वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने जायची तयारी पाहिजे. पत्रकारांमध्ये प्रतिवाद करण्याची, प्रश्न निर्माण करण्याची ताकद असली पाहिजे. पत्रकारितेवर दुहेरी संकट आले असून एक ज्यांना दुसरं काही जमत नाही ते पत्रकारितेत येऊ लागले आहेत आणि दुसरे म्हणजे बाहय़शक्ती पत्रकारितेला त्रस्त करीत आहे. त्यासाठी पत्रकारांनी स्वत:ला घडवणं आणि बौद्धिकतेच्या जोरावर बाहय़शक्तींना रोखले पाहिजे. अग्रलेख हा महत्त्वाचा भाग असताना मोठी दैनिके त्याला बगल देऊ लागल्याची खंतही कुबेर यांनी व्यक्त केली. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी, गरिबीचे उदात्तीकरण न करता आर्थिकदृष्टय़ा लेखणीतून सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली. समाजकारणात, राजकारणातही चांगले काम आहे. त्याचे वर्णन माध्यमांनी केले पाहिजे. समाजातील नकारात्मक परिस्थिती बदलण्यासाठी राजकीय नेत्यांसह माध्यमांनीही प्रयत्न करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. धनंजय मुंडे यांनी पत्रकारितेतील एका कुबेराचा राजकारणातील एका कुबेराकडून आज सत्कार होत असल्याचे सांगत कुबेर यांच्या नावाने एक विचारच राज्यातील पत्रकारितेसमोर उभा राहिला आहे. आजच्या परिस्थितीमध्ये अतिशय निर्भीड लिखाण करणे हे जोखमीचे काम असतानाही त्यांनी नोटाबंदीपासून अनेक विषयांवर लिखाण करीत विरोधी पक्षात काम करणाऱ्या आमच्यासारख्या तरुणांना प्रेरणा दिल्याचे नमूद केले.

खासदार रजनी पाटील यांनी ‘लोकसत्ता’चा अग्रलेख ही महाराष्ट्रासाठी मेजवानी असते, असे सांगून संसदेत पक्षीय भेद न मानता शरद पवार हे सदस्यांना मदत करीत असल्याचे सांगितले. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे, आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध झालेले अग्रलेख वाचनीय होते असे सांगून कुबेर यांचे पुस्तक हातात घेतले की पूर्ण वाचल्याशिवाय सुटत नाही, इतकी ताकद त्यांच्या शब्दात आहे, असे सांगितले. प्रास्ताविक वसंत मुंडे यांनी केले. आभारप्रदर्शन संतोष मानूरकर यांनी तर सूत्रसंचालन संजय मालाणी यांनी केले.

पंकजा-धनंजय एका व्यासपीठावर

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबातील फाटाफुटीनंतर राजकीय विरोधक बनलेले पंकजा आणि धनंजय हे मुंडे बहीण-भाऊ पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले. ते काय बोलतात याची उत्सुकता होती. सुरुवातीला धनंजय मुंडे यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय पालकमंत्री पंकजा मुंडे असा उल्लेख करताच टाळ्यांचा कडकडाट झाला, तर पंकजा यांनीही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे नाव घेताच टाळ्यांनी प्रतिसाद मिळाला.