टवाळखोरांचा मुलींना होणारा त्रास असह्य़ होऊन मुलींकडून टोकाचे पाऊल उचलले जाण्याच्या घटना नेहमीच घडतात. मात्र, या समजाला छेद देऊन इयत्ता आठवीत शिकणाऱ्या मुलीने जिद्दीने झुंज देत तिची छेडछाड करणाऱ्या चौघा टोळभैरवांना तीन वर्षांचा सश्रम कारावास घडविला! २०१२ मध्ये बाललंगिक कायद्यात झालेल्या महत्त्वपूर्ण बदलामुळेच या घटनेतील चौघे टवाळखोर गजाआड गेले आहेत. कायद्यातील नवीन तरतुदीमुळे येथील प्रकाराचा सहा महिन्यांतच निकाल लागला.

कळंब तालुक्यातील शिराढोण गावात गेल्या नोव्हेंबरमध्ये हा प्रकार घडला होता. या गावातील शाळेत आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीची जुबेर भाटेकर (वय १९), तयय्ब पटेल (वय २०), असलम शेख (वय २१) व हुमर शेख (वय २०) हे चार आरोपी सतत टवाळी करीत. ‘तू छान दिसतेस, माझ्याशी लग्न कर’, असा लकडा या तरुणांनी मुलीकडे दीड महिना लावला होता. २१ नोंव्हेबर या दिवशी शाळेत जाताना व येताना नेहमीप्रमाणे छेडछाड झाल्यावर मात्र मुलीच्या संयमाचा बांध फुटला. मुकाटय़ाने इतके दिवस त्रास सहन करणाऱ्या या मुलीने आजीच्या मदतीने थेट पोलीस ठाणे गाठले.

मूळची मुंबईची असलेली मुस्लीम कुटुंबातील ही मुलगी आईच्या निधनानंतर पुढील शिक्षणासाठी आपल्या मामाकडे शिराढोण येथे आली होती. इयत्ता आठवीत ती शिक्षण घेत होती. शिक्षण सुरळीत सुरू असताना या गावगुंडांनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला या बाबत मुलीने केलेल्या तक्रारीकडे आजीने कानाडोळा केला. मात्र, पाणी डोक्यावरून जाऊ लागले तेव्हा मात्र धाडस करीत तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली. मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. मात्र, त्यानंतर तिच्या कुटुंबीयांवर वेगवेगळ्या मार्गाने दबाव वाढू लागला. न्यायालयात सरकारी पक्षाने ७ साक्षीदार तपासले. पकी मुलीचे दोन वर्गबंधू न्यायालयात ऐन वेळी फितूर झाले. पण गुन्हेगारांना शिक्षा व्हायलाच हवी, यावर मुलगी ठाम राहिल्यामुळे हे गावगुंड गजाआड गेले आहेत. या चौघा आरोपींमधील एकाचे पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. बाकीचे तिघे गावात व्यवसाय करतात.