एका २१ वर्षीय मुलीच्या घरात शिरून तिच्यासह मित्राला बळजबरीने दारू पाजण्यात आली. त्यानंतर त्यांना जंगलात नेऊन चौघांनी सामूहिक बलात्कार केला व त्याचा एमएमएस तयार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले असता तिने स्वत: ही आपबिती कथन केली. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. 

दुर्गापूर मार्गावरील एस.टी. वर्कशॉपसमोर पीडित मुलगी भाडय़ाने वास्तव्याला होती. बुधवारी ती मित्रासोबत रूमवर असताना मध्यरात्री चार अज्ञात मुले तिच्या घरात बळजबरीने शिरले. यावेळी या चौघांनी तिला व तिच्या मित्राला जबरदस्तीने दारू पाजली. यानंतर दोघांनाही गाडीत बसवून जंगलात नेले.
अध्र्या रस्त्यात तिच्या मित्राला रस्त्यात फेकून दिले. त्यानंतर मुलीला जंगलात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेचा एमएमएस तयार करून चौघेही पसार झाले.
पीडित मुलीने गुरुवारी सकाळी या प्रकरणाची तक्रार रामनगर पोलिस ठाण्यात केल्यावर उपविभागीय अधिकारी राजू भुजबळ यांनी तपास सुरू केला. सायंकाळी वसिम नावाच्या तरुणाला अटक करण्यात आली असून अन्य तिघे अद्याप फरारी आहेत.
दरम्यान, पीडित मुलीला सायंकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणले असता तिने प्रसारमाध्यमांकडे आपबिती कथन केली. दारूच्या नशेत असल्यामुळे हा संपूर्ण घटनाक्रम आठवत नाही. मात्र, यातील वसिम व अन्य दोघांना आपण स्वत: ओळखत असून त्यांनी नावे पोलिसांना दिल्याचे सांगितले. या मुलीच्या मित्राला गंभीर दुखापत झाल्याने त्याला डॉ.अमल पौद्दार यांच्या रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी पीडित मुलीच्या घराची तपासणी केली असता तेथे दारूच्या बाटल्या व खाद्यपदार्थ सापडले.