रायगड जिल्ह्य़ातील सहा तालुक्यांत मुलींचे प्रमाण घटत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या तालुक्यात नागरीकरण, औद्योगिकीकरण आणि स्थलांतरणाचे प्रमाण अधिक आहे. त्याच ठिकाणी मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी झाले आहे.      राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत कोकणात मुलींचे प्रमाण कितीतरी पटीने चांगले होते. मात्र वाढत्या नागरीकरणामुळे, औद्योगिकीकरण आणि स्थलांतरणामुळे आता हे प्रमाण घटत असल्याचे २०११ च्या जनगणनेनुसार समोर आले आहे. वैद्यकीय सोयीसुविधा वाढलेल्या तालुक्यात मुलींच्या तुलनेत मुले जन्माला येण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे. ही जिल्ह्य़ासाठी चिंतेची बाब आहे.
विशेषत: पनवेल, उरण, खालापूर, माणगाव, सुधागड पाली आणि पेण यांसारख्या मुंबई पुण्यालगत वसलेल्या तालुक्यात मुलींचे प्रमाण घटले आहे. पनवेल तालुक्यात १९९१ साली दर हजार मुलांमागे ९४७ मुली जन्माला येत असत, २००१ मध्ये हे प्रमाण घसरून ९४१ तर २०११ मध्ये यात आणखीन घट होऊन हे प्रमाण ९१९ वर आले. उरण तालुक्यात १९९१ साली मुलींचे प्रमाण दर हजार मुलांमागे ९५४ होते. हे प्रमाण २००१ मध्ये ९३८ वर आले, तर २०११ मध्ये हे प्रमाण घसरून ९२० वर आले.
खालापुर तालुक्यात १९९१ साली हजार मुलांमागे ९६३ मुली जन्माला येत होत्या. हे प्रमाण घसरून २००१ मध्ये ९२१ वर आले, तर 2011 मध्ये हे प्रमाण 915 वर आले. सुधागड पाली तालुक्यात 1991 मध्ये हजार मुलांमागे ९४७ मुली जन्माला येत असत. हे प्रमाण घटून २००१ मध्ये ९३८ झाले होते. तर २०११ मध्ये यात घट होऊन ते ९३१ वर आले आहे. माणगाव सारख्या मध्यवर्ती तालुक्यातही मुलींचे घटणारे प्रमाण चिंतेची बाब आहे. या ठिकाणी १९९१ मध्ये मुलींचे प्रमाण हजार मुलांमागे ९७३ होते. ते २०११ मध्ये घटून ९२२ वर आले आहे.
विशेषत: ज्या तालुक्यात मोठय़ा प्रमाणात औद्योगिकीकरण झाले आहे, ज्या तालुक्यात नागरीकरणाला वेग आला आहे, आणि जिथे बाहेरून स्थलांतरित होणाऱ्या सुशिक्षित लोकांचे प्रमाण वाढते आले, त्याच तालुक्यात मुलींचे प्रमाण घटत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे याबाबत वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. रायगड जिल्ह्य़ात गर्भिलग तपासणी प्रतिबंध कायद्यानुसार आजवर १५ प्रकरणे समोर आली आहेत. यातील पाच डॉक्टरांना शिक्षाही करण्यात आली आहे. तर एक प्रकरण अपिलात आहे.
 कायद्याची दहशत बसवली गेली तरच हे प्रकार थांबवणे शक्य असल्याचे राज्य महिला लोक आयोगाच्या कार्याध्यक्षा अ‍ॅड. वर्षां देशपांडे यांनी व्यक्त केले आहे. समाजप्रबोधन केल्याशिवाय गर्भिलग चाचणी आणि स्त्रीभृण हत्यासारखे अनिष्ट प्रकार थांबू शकणार नाहीत, वेळीच याची दखल घेतली नाही, तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ासारखी परिस्थिती कोकणात व्हायला वेळ लागणार नाही असे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले.
महिला अत्याचाराचे प्रमाणही वाढले
जिल्ह्य़ात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाणही वाढत असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्य़ात हुंडाबळीच्या १९ घटना घडल्या आहेत. नवऱ्याकडून होत असलेल्या छळाची ४० प्रकरणे समोर आली आहेत. महिला आत्महत्येची १० प्रकरणे समोर आली आहेत. तर बलात्काराच्या २१ घटना घडल्या आहेत. छेडछाड केल्याप्रकरणी ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्याच्या इतर भागांप्रमाणेच जिल्ह्य़ात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येत्या गणेशोत्सवात महिला सुरक्षेबाबत देखावे सादर करून समाजप्रबोधनाचे काम करण्याचा मानस महिला लोक आयोगाने व्यक्त केला आहे.