सरकारी योजनांचा निधी खर्च झाला म्हणजे विकास होतो असे नाही, तर त्यासाठी नियोजन व लोकसहभाग आवश्यक आहे. दुष्काळ कायमचा कमी करण्यास जलसंधारणाच्या योजना प्रत्येकाने समजून जपाव्यात. योजना ही सोपस्कार नाही तर संस्कार असल्याने कोणतेही पक्षीय राजकारण न करता जलसंधारण योजना प्रभावीपणे राबवाव्यात, असे आवाहन ग्रामविकास व जलसंधारणमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. सामाजिक न्याय सप्ताह साजरा करतांना प्रशासनाने जिथे कमी तिथे पोचण्याचा प्रयत्न करावा.
जलसंधारण विभागाच्या एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे उदघाटन शनिवारी मुंडे यांच्या हस्ते झाले. कृषी आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश भताने यांच्यासह भाजपचे आमदार व पाणलोट समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. मंत्री मुंडे म्हणाल्या की, सरकारच्या योजनांचा निधी मोठया प्रमाणात खर्च होतो. पण विकास होतो का? जलसंधारणावर आतापर्यंत खर्च झालेल्या पशात दोन राज्ये चालतील. निधी खर्च करताना नियोजन व लोकांचा सहभाग आवश्यक आहे.