यंदाची लोकसभा निवडणूक लढवावी की नाही याबद्दल आपल्यापुढे संभ्रमावस्था होती, परंतु भगवानबाबा गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी दिलेला आदेश आपल्याला सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे असल्याने तो प्रमाण मानून निवडणूक लढवली, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी आज गोळेगाव (ता. शेवगाव) येथे बोलताना केले.
गोळेगाव येथील ८१ व्या नारळी सप्ताहाच्या सांगताप्रसंगी, रविवारी मुंडे उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मुंडे यांनी जिल्ह्य़ात एकही प्रचार सभा घेतली नाही, त्यामुळे ते आज काय बोलतात याबद्दल उत्सुकता व्यक्त केली जात होती. सप्ताहाच्या सांगताप्रसंगी महंत डॉ. नामदेव शास्त्री, दशरथ वनवे, तुषार वैद्य, नितीन काकडे, अरुण मुंडे, संपत कीर्तने, गोविंद घोळवे आदी उपस्थित होते.
आपल्या राजकीय जीवनात आपण कधीही जाती पातीचे राजकारण केले नाही, जनसेवा हीच ईश्वरसेवा मानली. महंत नामदेवशास्त्री यांनीही आपल्या निवडणूक लढवण्याच्या संभ्रमावस्थेबद्दल, राजकारणात राहून केलेली समाजसेवा हीच संतसेवा असल्याचे सांगत निवडणूक लढवण्याचा आदेश दिला, त्यामुळे आपण निवडणूक लढवली, असे मुंडे म्हणाले.
सप्ताहाच्या सुरुवातीला, दि. १३ रोजी आपण उपस्थित राहणार होतो परंतु धार्मिक व्यासपीठाचा वापर राजकिय कारणासाठी केला व महंतांनी आशीर्वाद दिले असा आरोप कोणी करु नये यासाठीच येथे येणे टाळले, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येकाच्या जीवनात अध्यात्माला मोठे महत्व आहे, राजकिय जीवनात दैनंदिन वैचारिक युद्धाचे प्रसंग येत असतात, अशावेळी शांत राहण्याचे काम अध्यात्मामुळे शक्य होते, असेही ते म्हणाले.
सध्याची राजकिय परिस्थिती बदलत चालली आहे, काही जण स्वार्थासाठी काहीही करु पहात आहेत, आपण मात्र राजकिय जीवनात स्वार्थाला कधीही थारा दिला नाही, राजकारणात चांगली माणसेही आली पाहिजेत, श्रद्धा हवी परंतु तो डोळस हवी, आपली भगवानबाबांवर डोळस श्रद्धा आहे, त्यामुळेच येथे एवढी मोठी गर्दी जमा झाली, एवढी गर्दी राजकारणात जमा करण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात, तरीही गर्दी होईल याची खात्री नसते, साहित्य व अध्यात्म यामुळे समाज शिक्षित होतो, त्यामुळे असे कार्यक्रम सारखे व्हावेत, पुढिल वर्षी भगवानगडावर सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम आहे, त्याच्या यशस्वीतेसाठीही आपण प्रयत्न करु, असे मुंडे म्हणाले. घोळवे व नीळकंठ कराड यांनी स्वागत केले. बाळासाहेब फुंदे यांनी आभार मानले.