लोकसभा निवडणुकीत डाव्यांचा पराभव झाला. १९५२ सालापासून एवढय़ा कमी जागा मिळाल्या. या पिछेहाटीमागे डाव्या व पुरोगामी शक्तीची झालेली शकले, कामगार संघटना अर्थवादात अडकून राजकीयीकरणात कमी पडल्या. प्रसारमाध्यमांच्या मदतीचा अभाव ही कारणे आहेत. मात्र भविष्यात चळवळीच्या वाढीला ‘अच्छे दिन’ येणार आहेत, असे प्रतिपादन कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय नियंत्रण मंडळाचे सचिव गोविंद पानसरे यांनी केला.
पानसरे म्हणाले, भारतीय राजकारणाने एक नवे प्रतिगामी वळण घेतले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नियंत्रित व्यक्तिमत्त्व आहे. संघाला भारतीय राज्यघटना, संसदीय पद्धतीची लोकशाही नको असून अध्यक्षीय पद्धत हवी आहे. व्यक्तिकेंद्रित पद्धतीने देशाचे राजकारण करण्याचे त्यांचे मनसुबे आहे. एक चालकानुवर्ती अशी त्यांची पद्धती असून चातुर्वण्र्य, विषमतेचा ते पुरस्कार करतात. परधर्मद्वेष ही त्यांची भूमिका आहे. बाजारू व अर्थव्यवस्था हा त्यांचा आदर्श आहे. त्यामुळे देशात महागाई व बेकारी वाढून गरीब, कामगार, शेतकरी व श्रमिकांचे शोषण वाढवणारी व्यवस्था आणण्याचे प्रयत्न होणार आहेत, असे पानसरे म्हणाले.
मोदी यांचा विजय हा नकारात्मक असून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जनविरोधी धोरणाचा परिपाक आहे. काँग्रेसविरोधी भावनेचा हा विजय आहे. निवडणूक काळात प्रसारमाध्यमांनी मोठी भूमिका बजावली. माध्यमे भांडवलदारांच्या ताब्यात आहेत, त्यांच्यावर संघाने कब्जा केला आहे. यात डावे पक्ष कमकुवत झाले असले तरी वास्तव मात्र त्यांना अनुकूल आहे. भ्रमावर मिळविलेला विजय टिकाऊ नसतो तसेच संघ या देशात रुजणार नाही, त्यासाठी प्रबोधन व संघर्ष करावा लागेल. राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष पराभवाने शहाणे झालेले नाहीत. राज्यात डावे पक्ष सत्तेचे दावेदार नाही. पण तेच भांडवली विचारसरणीला वेसण घालू शकतात. डाव्यांना भविष्यात त्यामुळे बळ मिळेल, असा दावा त्यांनी केला.
राज्यात जनतेच्या प्रश्नावर सामुदायिक आंदोलन करण्याकरिता डावे पक्ष, भारिप बहुजन महासंघ, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, सत्यशोधक कम्युनिष्ठ पक्ष या संघटना एकत्र आल्या असून पुणे येथे दि. २८ व २९ रोजी शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात प्रा. पुष्पा भावे, प्रकाश आंबेडकर, मुक्ता मनोहर व आपण मार्गदर्शन करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
अंबानी गेले, अदानी आले
केंद्रात झालेले सत्तांतर म्हणजे अंबानी जाऊन त्यांच्या जागी अदानी आले आहे एवढाच अर्थ आहे. विकास हा ठराविक विभागासाठी एवढाच त्यांचा अजेंडा आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या व दलितांवरील अत्याचार त्यामुळे घडत आहेत. तसेच आघाडी सरकारने पुरोगामी विचाराचा पराभव केला आहे, अशी टीकाही पानसरे यांनी केली.