थेट शेतकऱ्यांकडून ग्राहकांपर्यंत चांगला व दर्जेदार आंबा उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीने भरवलेल्या आंबा महोत्सवात गुरुवारी पहिल्या दिवसांपासून ग्राहकांनी प्रतिसाद देत आंबा खरेदी करण्यास सुरुवात केली. या आंबा महोत्सवात कोकणातून पाच हजार पेटय़ांपेक्षा अधिक हापूस आंबा उपलब्ध झाला आहे. फळांच्या राजाचे भरभरून स्वागत होत आहे. या निमित्ताने होम मैदानाच्या परिसरात हापूस आंब्यांच्या सुवासाचा घमघमाट सुटला आहे.

राज्यातील चौथ्या स्थानावर असलेल्या सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीने यापूर्वी दोन-तीन वर्षे आंबा महोत्सव भरवला होता. त्यास अलीकडे खंड पडला होता. ही खंडित परंपरा आता पुन्हा सुरू झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीने प्रथमच तांदूळ महोत्सव भरवला असता त्यास ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर होम मैदानावर आयोजिलेल्या आंबा महोत्सवात कोकणातून ३० हापूस आंबा उत्पादक शेतकरी दाखल झाले आहेत. तर सोलापूर जिल्हय़ासह शेजारच्या कर्नाटकातूनही आंबा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उपलब्ध झाला आहे. हापूस आंब्याचा दर ३५० रुपयांपासून ते १२०० रुपयांपर्यंत मिळत आहे.

या आंबा महोत्सवाचा औपचारिक उद्घाटन सोहळा सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला. अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे हे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक डी. टी. लावंड यांची प्रमुख उपस्थिती होती.

सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती, माजी आमदार दिलीप माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ग्राहकांना थेट शेतकऱ्यांकडून चांगला, दर्जेदार व उच्च प्रतीचा आणि किफायतशीर दरात आंबा मिळावा, शेतकऱ्यांनाही बाजारपेठ मिळावी, या हेतूने आंबा महोत्सव भरविण्यात आला आल्याचे त्यांनी नमूद केले. हा महोत्सव (५ ते ९ मे पर्यंत) पाच दिवस चालणार आहे.

या वेळी पालकमंत्री विजय देशमुख यांनी सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या या उपक्रमाचे कौतुक करीत, आंबा महोत्सवास सोलापूरकर उत्तम प्रतिसाद देतील, असा विश्वास व्यक्त केला. या निमित्ताने आंबा उत्पादक शेतकरी व ग्राहक यांचे स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. शासनाच्या धोरणाला पूरक असाच हा आंबा महोत्सव असल्याचे देशमुख यांनी नमूद केले.

आंबा उत्पादन क्षेत्रात भरीव योगदान दिलेले राष्ट्रपती पुरस्काराचे मानकरी विलास ठाकूर (वेंगुर्ला) यांनी या वेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन शासनाने फलोत्पादनाचा कार्यक्रम शंभर टक्के अनुदानावर राबवल्यामुळे आंबा उत्पादन वाढल्याचा उल्लेख केला. कोकणात आजघडीला ४८ हजार हेक्टर क्षेत्रात आंब्याची शेती बहरली असून, कालपर्यंत मुंबईच्या बाजारपेठेवर कोकणातील फळांच्या राजाचे भवितव्य अवलंबून होते. परंतु आता राज्यात व देशात सर्वत्र फळांचा राजा पोहोचला आहे. सोलारपूरच्या आंबा महोत्सवाच्या निमित्तानेही त्याचे स्वागत झाल्याचे ठाकूर यांनी नमूद केले. तत्कालीन कृषिमंत्री राधाकृष्ण क्रिकेट प्रशिक्षक बबन गावसकर यांचे निधनवखे-पाटील यांच्या पुढाकाराने ‘मँगो नेट’ ही संकल्पना साकार झाली. यात एकत्र आलेल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंब्यांचे प्रमाणीकरण होऊन व्यवहार अधिक सुलभ होतात. त्याचा लाभ शेवटी शेतकरी व ग्राहकांनाच होतो. त्यातूनच शेतकरी सहजपणे आंबा निर्यात करताना दिसतात, याचा उल्लेख त्यांनी केला.

या वेळी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हा उपनिबंधक लावंड, अशोक देवकते आदींची भाषणे झाली. कृषिउत्पन्न बाजार समितीचे उपसभापती चंद्रकांत खुपसंगे यांनी आभार मानले. अर्पिता खाडिलकर यांनी सूत्रसंचालन केले.