राज्यातील दुसऱया टप्प्यातील १९ मतदारसंघातील मतदानाला गुरुवारी मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मतदान संपल्यानंतर राज्यभरात सरासरी ६१.७ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.  सर्वच मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा जास्त मतदान झाल्यामुळे याचा झटका कोणाला बसणार यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. राज्यातील १९ मतदारसंघातील ३५८ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रांमध्ये बंद झाले. गुरुवारी कडक उन्हातही असंख्य मतदार मतदान केंद्राबाहेर रांगेत उभे राहून मतदान करीत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते.
पुण्यात असंख्य मतदारांची नावे मतदारयादीतून गायब झाल्यामुळे लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला. तर सांगलीतील कुपवाडमध्ये मतदानासाठी रांगेत थांबलेल्या एका महिलेचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
पुण्यात नावे गायब
पुण्यातील कसबा पेठ, शिवाजीनगर या दोन विधानसभा मतदारसंघातील असंख्य मतदारांची नावेच मतदार यादीतून गायब झाल्याने लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेक वर्षांपासून ठराविक मतदान केंद्रावर मतदान करीत असलेल्या नागरिकांना गुरुवारी तिथे गेल्यावर आपले नावच मतदारयादीत नसल्याचे लक्षा आल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. मतदान केंद्रावरील अधिकाऱयांनी नावे नसलेल्या मतदारांना मतदान करण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे लोकांच्या संतापात भर पडली. मतदारयादीत नाव नसेल तर फॉर्म नंबर सात भरून द्यावा लागतो. हा फॉर्म दिल्यावर पुढील वेळी मतदारयादीत संबंधित मतदाराचे नाव घातले जाईल आणि त्यानंतरच त्याला मतदानाचा हक्क बजावता येईल, असे पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी स्पष्ट केले. मात्र, अनेक मतदान केंद्रांवर हा फॉर्मच उपलब्ध नसल्याचे दिसून आले.
प्रत्येक मत ‘पंजा’लाच
पुण्यातील शामराव कलमाडी शाळेतील मतदान केंद्रावर सकाळच्यावेळी एका मतदान यंत्रामध्ये कोणतेही बटण दाबले तरी कॉंग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम यांनाच मतदान होत असल्याचे मतदारांच्या लक्षात आले. त्यानंतर काहीवेळ या ठिकाणी मतदान थांबविण्यात आले होते. मतदान केंद्रावरील अधिकाऱय़ांनी मतदानयंत्र बदलल्यानंतर पुन्हा मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या टप्प्यात मतदान केलेल्या २८ मतदारांना पुन्हा मतदान करण्याची परवानगी देण्यात आली.
उस्मानाबादमध्ये रोकड जप्त
उस्मानाबादमधील तुळजापूर-नळदुर्ग रस्त्यावर टोल नाक्यावर १२ लाख ८९ हजार रुपये सापडले. निवडणूक निरीक्षक जयराज नाईक यांनी छापा टाकून ही रक्कम जप्त केली. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येतो आहे.
दिग्गजांचे मतदान
गुरुवारी सकाळी देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, गोपीनाथ मुंडे, राजू शेट्टी यांच्यासह निवडणूक लढविणाऱया विविध उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला.
कोल्हापुरात सर्वाधिक मतदान
दुसऱया टप्प्यामध्ये कोल्हापुर जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघांमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान झाले. या दोन्ही मतदारसंघांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान दुपारपर्यंत झाले होते.
मोदींची लाट नाही
देशात मोदींची लाट नसल्याचे वक्तव्य गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मतदान केल्यानंतर केले. सोलापूरमध्ये आपलीच लाट असल्याचेही त्यांनी सांगितले. यंदाच्या निवडणुकीतही आपण भरघोस मतांनी विजयी होऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्यभरात झालेल्या मतदानाची टक्केवारी
पुणे – ५८.७५
मावळ – ६३.१०
शिरूर – ५९.५०
बारामती – ५८.२०
उस्मानाबाद – ६५
लातूर – ६२
हातकणंगले – ६७
कोल्हापूर – ६८
नांदेड – ६३
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – ६०
शिर्डी – ६१
हिंगोली – ६३
सोलापूर – ५७