उक्शी आणि संगमेश्वर स्थानकांदरम्यान मालगाडीचे डबे घसरल्याने सोमवारी सकाळपासून कोकण रेल्वेची वाहतूक पूर्णपणे बंद झाली. यामुळे उन्हाळी सुट्टीच्या हंगामात कोकणाकडे निघालेल्यांची दैना झाली. रेल्वेमार्ग दुरुस्त करण्यासाठी दोन दुरुस्ती गाडय़ा आणि एक वैद्यकीय मदत करणारी गाडी तसेच दोनशे कामगारांचा ताफा रात्री उशिरापर्यंत काम करत होता. मात्र, मार्ग सुरू न होऊ शकल्याने मंगळवारीही कोकण रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत राहण्याची भीती आहे.
रत्नागिरीपासून १९ किमी अंतरावरील उक्शी रेल्वेस्थानकानजीकच्या बोगद्याजवळ मालगाडीच्या ४१ डब्यांपैकी चार ते पाच डबे सकाळी सव्वा आठच्या सुमारास रुळांवरून घसरले. त्यामुळे स्लिपरचे तुकडे होऊन रुळांनाही तडे गेले. परिणामी कोकण रेल्वेवरील संपूर्ण वाहतूक बंद पडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोकण रेल्वेचे अधिकारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले. या दुर्घटनेमुळे कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या काही गाडय़ा विविध स्थानकांत रद्द करण्यात आल्या, तर काही गाडय़ा रवानाच झाल्या नाहीत. काही गाडय़ा वेगळ्या मार्गाने रवाना करण्यात आल्या. या वेळी मार्गावर असणाऱ्या सावंतवाडी-दिवा पॅसेंजर, सावंतवाडी-दादर खास गाडी, दादर-रत्नागिरी एक्स्प्रेस या गाडय़ांमधील प्रवाशांची एसटी बसेसमधून नियोजित ठिकाणी नेण्याची व्यवस्था करण्यात आली.
या अपघातामुळे उन्हाळी सुटय़ांच्या मोसमात कोकणात निघालेल्या चाकरमान्यांची पंचाईत झाली. दादर, मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस आदी स्थानकांमधून थेट कोकणात जाणाऱ्या गाडय़ा रद्द करण्यात आल्याच्या उद्घोषणा सुरू असल्याने प्रवासी गावी जाण्यासाठी इतर मार्गाचा शोध घेत होते. त्यामुळे खासगी बस चालकांकडे आणि एसटीकडे गर्दीचा ओघ होता.

एसटीचा मदतीचा हात
दुर्घटनेची माहिती मिळताच राज्य परिवहन महामंडळाने रत्नागिरी आणि संगमेश्वर या दरम्यान २५ जादा बसगाडय़ा सोडल्या. रेल्वे दुर्घटनेमुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या प्रवाशांना जवळच्या बस स्थानकापर्यंत जाता यावे, यासाठी एसटीने जादा गाडय़ा सोडल्याची माहिती एसटीचे साहाय्यक जनसंपर्क अधिकारी मुकुंद धस यांनी दिली. त्याशिवाय गरज पडल्यास आणि कोकण रेल्वेने विनंती केल्यास आणखी जादा गाडय़ा चालवण्यात येतील, अशी माहितीही त्यांनी दिली.

गाडय़ांच्या मार्गात बदल
* मडगांव- सीएसटी मांडवी एक्स्प्रेस, मंगलोर-कुर्ला मत्स्यगंधा एक्स्प्रेस, मडगांव- सीएसटी कोकणकन्या एक्स्प्रेस, अहमदाबाद- मंगलोर उन्हाळी विशेष गाडी, दादर-मडगांव जनशताब्दी एक्स्प्रेस या गाडय़ा पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
* दहा गाडय़ा पनवेल, पुणे, मिरज, लोंडा, मडगाव मार्गे वळवण्यात आल्या. तिरुअनंतपूरम नेत्रावती एक्स्प्रेस (मुंबईहून), निजामुद्दीन-तिरुअनंतपूरम राजधानी एक्सप्रेस (दिल्लीहून), एलटीटी-कोचुवेली (तिरुअनंतपूरम, गरीब रथ (मुंबईहून), सीएसटी-मंगलोर एक्सप्रेस (मुंबईहून) निघणाऱ्या गाडय़ा वळवण्यात आल्या.
* एर्नाकुलम एलटीटीएसी दुरांतो एक्सप्रेस, अर्नाकुलम-अजमेर मरुसागर एक्सप्रेस, मंगलोर सीएसटी एक्सप्रेस, कुचुवेली-एलटीटी एक्सप्रेस, तिरुनेवेवी-हापा एक्सप्रेस, कोचुवेली-चंडीगड केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस गाडय़ा मडगाव, लोंडा, पुणे, पनवेल मार्गे वळवण्यात आल्या.
* एलटीटी नेत्रावती एक्सप्रेस, अर्नाकुलम निजामुद्दीन मंगला एक्सप्रेस व अमृतसर-कोचुवेली एक्सप्रेस या गाडय़ांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कोकण रेल्वेने संगमेश्वर व रत्नागिरी येथून पर्यायी व्यवस्था केली.
* सावंतवाडी-दिवा पॅसेंजर, दादर- मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस या गाडय़ांवर परिणाम झाला आहे.