आद्य समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या टेंभू (ता.कराड) या गावी असलेल्या स्मारकाची दुरवस्था झाली आहे. आजवर राज्यकर्त्यांनी या स्मारकासाठी निधी देण्याच्या केवळ घोषणाच केल्याने टेंभू परिसरातील ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

आद्य समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर टेंभू येथे स्मारक आहे. या स्मारकाची सध्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. स्मारकाची पडझड झाली असून, त्यातील फरशा पूर्णपणे निघून गेल्या आहेत. दारे-खिडक्यांची मोडतोड झाली आहे. या स्मारकाच्या नूतनीकरणासाठी काँग्रेस आघाडीच्या काळात तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी टेंभूला भेट दिली होती. त्यावेळी आगरकर स्मारकासाठी १ कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल अशी घोषणा पाटील यांनी केली. परंतु, निधी काही मिळेना म्हणून टेंभू ग्रामस्थांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही निधीच्या तरतुदीसाठी अनेकवेळा भेटून निवेदने देण्यात आली. मात्र, तरीही टेंभूकरांच्या पदरी निराशा आली. दरम्यान, आगरकर स्मारकासंदर्भात गावपुढाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींनाही साकडे घातले. निवेदने दिली. मात्र, त्यांनीही याकडे दुर्लक्ष केले. आता, राज्यात सत्तांतर होऊन भाजपा सरकार सत्तेत आले आहे.

यावर टेंभू ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थांनी पश्चिम महाराष्ट्राचे कारभारी व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची अनेकदा भेट घेऊन त्यांनाही आगरकर स्मारकाच्या नूतनीकरणासाठी निधी मिळावा म्हणून निवेदने दिली. मात्र, इथेही अद्याप निराशाच पदरी आली आहे. आगरकरांचे समाजकार्य सर्वश्रुत असताना आघाडी आणि भाजप या दोन्ही सरकारचे त्यांच्या स्मारकाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान या स्मारकाच्या या दुरवस्थेबद्दल आता टेंभूकर ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. टेंभूच्या सरपंच कल्पना जंगम म्हणाल्या, की आद्य समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मारकाची दुरवस्था सरकारने गांभीर्याने घेऊन त्वरीत दुरुस्ती करावी. अन्यथा ग्रामस्थाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.