संपूर्ण हयात रंगभूमीच्या आणि कलेच्या सेवेत घालवल्यानंतर विपन्नावस्थेत जगणाऱ्या अनेक कलाकारांच्या कहाण्या आतापर्यंत प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र या निराधार आणि विपन्नावस्थेतील कलाकारांसाठी राज्य सरकार नाटय़ परिषदेच्या माध्यमातून ‘कलाश्रम’ उभारणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी केली.
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बारामती येथे झालेल्या ९३व्या नाटय़ संमेलनातील विविध ठरावांबाबत बैठक झाली. या बैठकीत नाटय़ परिषदेचे अध्यक्ष हेमंत टकले, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, ज्येष्ठ कलाकार अशोक हांडे व विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
निराधार कलाकारांसाठी उभारण्यात येणाऱ्या या ‘कलाश्रमा’साठी सरकारकडून एकरकमी निधी दिला जाणार आहे. याशिवाय वृद्ध कलावंतांच्या मानधनात पुढील वर्षांपासून वाढ करण्यात येणार आहे.
वाढीव वार्षिक मानधन पुढील वर्षांपासून
‘अ’ वर्ग कलावंत – १८ हजार रुपये
‘ब’ वर्ग कलावंत – १५ हजार रुपये
‘क’ वर्ग कलावंत- १२ हजार रुपये
मानधनासाठी पात्र कलाकारांची निवड करणाऱ्या जिल्हास्तरीय समितीमध्ये यापुढे नाटय़ परिषदेने सुचवलेले दोन सदस्य असतील, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले. याव्यतिरिक्त, शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्य नाटय़ स्पर्धा यापुढे नाटय़ परिषदेकडे सोपवण्यास पवार यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे. याबाबतचा प्रस्ताव आता सांस्कृतिक खाते आणि नाटय़ परिषद एकत्रितपणे तयार करतील. तसेच नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षांना त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात नाटय़ क्षेत्राशी संबंधित सरकारच्या विविध समित्यांवर निमंत्रक सदस्य म्हणून नेमण्यात येईल, अशी घोषणाही पवार यांनी केली.