आखाडीची जत्रा.., गटारी अमावस्या.., सामिष भोजन.. अन् सोबत अपेयपानाचा आस्वाद. यामुळे सांगली-मिरज मार्गावरील एक शासकीय कार्यालय पहाटेपर्यंत जागेच होते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या ठिकाणी रेव्हपार्टी सुरू असल्याचा साक्षात्कार झाल्याने पोलिसांना पाचारण केले. मात्र हाच अधिकारी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हताच. कसातरी घरी पोहोचलेल्या या अधिकाऱ्याची शनिवारी सकाळी मात्र पालकमंत्र्यांच्या शब्द फुलांनी पूजा झाल्याची जोरदार चर्चा विश्रामधाममध्ये सुरू होती.
रविवारपासून श्रावण महिना सुरू होत असल्याने पूर्णपणे शाकाहारी आहारावर महिन्याची गुजरान करावी लागणार असल्याने शुक्रवारी रात्री सांगली-मिरज मार्गावरील एका शासकीय कार्यालयात मेजवाणीचा बेत निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार सामिष भोजनाची व्यवस्था करण्याबरोबरच अपेयपानाची तजवीजही करण्यात आली होती. संपादनात अग्रेसर असणाऱ्या या कार्यालयात या मेजवाणीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले होते.
रात्री उशिरापर्यंत साग्रसंगीत मेजवाणीचा बेत सुरू होता. मात्र वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याच्या मनात उपस्थितांची फिरकी घेण्याचा मनसुबा उफाळून आला. हातात असणाऱ्या मोबाईलवरून त्याने मिरज पोलिसांना शासकीय कार्यालयात रेव्हपार्टी सुरू असल्याचा निनावी संदेश धाडला. पोलिसांनाही आयतेच कोलीत मिळाल्यामुळे तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
मोबाईलवरून संदेश देणाऱ्या अधिकाऱ्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. वरात पोलीस ठाण्याला जाणार हे लक्षात येताच या अधिकाऱ्याने मी सुद्धा छापा मारण्यासाठीच आलो असून वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगत पोलिसांना रिकाम्या हाती ठाण्याकडे पाठवले. पोलिसांनीही मेजवाणीत सहभागी झालेले सर्वजण शासकीय कर्मचारी असल्याने हे प्रकरण गांभीर्याने न घेता जणूकाही घडलेच नाही अशी भूमिका घेतली.
तथापि झालेल्या घटनेची माहिती शनिवारी सकाळी मुंबईहून सांगलीस आलेल्या पालकमंत्र्यांच्या कानी पडली. विश्रामधाम येथे शासकीय अधिकाऱ्यांना आढावा बठकीसाठी बोलवले असता रात्रीच्या प्रकारातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित असल्याचे आढळून येताच जिल्ह्यात काम करायचे असेल तर व्यवस्थित राहा अथवा अन्य ठिकाणी जायची तयारी ठेवा असा सज्जड दमही या अधिकाऱ्याला देण्यात आल्याची चर्चा दिवसभर सुरू होती.