मराठवाडय़ात २१९ महसूल मंडळात ५० टक्क्य़ांपेक्षा कमी पाऊस झाला. परिणामी टँकरची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. प्रमुख शहरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. औरंगाबाद आणि जालना या दोन शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडीत ५.३ टक्के एवढा जलसाठा आहे. उपयुक्त पाणीसाठी दोन महिने टिकेल. त्यानंतर मृतसाठय़ातील पाण्यासाठी पूरक योजना करावी लागणार आहे. परभणी आणि हिंगोलीचा पाणीसाठी डिसेंबपर्यंत पुरेल. मात्र, संकटात आहे ते लातूर शहर. त्यामुळे या शहराला रेल्वेहून पंढरपूरने आणि उजनी जलाशयातून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले जात आहे.
बीड जिल्ह्य़ातील अंबाजोगाई, धारूर, केज, उस्मानाबाद व कळंब या नगरपालिकांना मांजरा धरणातून पाणीपुरवठा होतो. सप्टेंबपर्यंत कसेबसे पाणी जाईल. त्यानंतर कळंब शहराला टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. अंबाजोगाईसाठी कळवंटी प्रकल्पातून ३५० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर असून ती कार्यान्वीतही झाली आहे. तर केज शहरासाठी जाधवजवळा साठवण तलावातून व धारूर शहरासाठी कुंडलिका प्रकल्पातून प्रत्येकी १५ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. आष्टी तालुक्यास कर्जतमधून सीना प्रकल्पाच्या बॅकवाटरमधून १७ टँकरने पाणीपुरवठा सुरू असून बीड जिल्हाधिकाऱ्यांनी सीना प्रकल्पातून पाणी आरक्षणाचा प्रस्ताव अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. वैजापूर शहरास पर्यायी स्रोत घोयगाव येथील तलावातून व नांदूर मधमेश्वर प्रकल्पाच्या चारीतून पाणी मिळते. त्यासाठी नाशिक आयुक्तालयाबरोबर संपर्क सुरू आहे. औरंगाबाद शहरासाठी भंडारदरा, निळवंडे आणि गंगापूर धरणातून पाणी सोडल्यास मराठवाडय़ाला काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल, अशी स्थिती आहे. दिवसेंदिवस भूजलाची स्थितीही गंभीर झाली आहे. औरंगाबाद आणि लातूर या दोन जिल्ह्य़ांत भूजल सर्वात खाली गेले आहे. १२.४४ मीटरवर भूजलाची पातळी खालावल्याने चिंतेचे वातावरण आहे. पाणीपुरवठा कसा करायचा आणि कोठून करायचा, याबाबतचे आराखडे रोज मांडले जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतही याबाबतची रविवारी माहिती देण्यात आली.