रस्त्यावर कांदा ओतून सरकारचा निषेध
राज्य दुष्काळात होरपळत असतानाही महायुतीच्या सरकारने कुठलेही नियोजन केले नाही. त्यांच्या चुकीच्या धोरणाने उच्छाद मांडला असून ग्रामीण भाग उध्वस्त होत आहे. येत्या ५ तारखेपर्यंत उपाययोजना केल्या नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर तीव्र आंदोलन करेल असा इशारा राष्ट्रवादीचे नेते व विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे यांनी दिला.
नेवासे तहसिल कचेरीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली आज, रविवारी विविध मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. मोर्चात वळसे, ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकर पिचड, माजी आमदार नरेंद्र घुले, पांडुरंग अभंग, चंद्रशेखर घुले, शंकर गडाख, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा गुंड, माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे आदी सहभागी झाले होते. तहसिलदार नामदेव कोळेकर यांना निवेदन देण्यात आले. आंदोलकांनी रस्त्यावर कांदा ओतुन सरकारचा निषेध केला.
भाजपाचे सरकार हे शेतकरी विरोधी असून कांदा, दुध, साखर तसेच अन्य शेतमालाला भाव नाही. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या काळात कांदा निर्यातीला परवाणगी दिली. पण महायुतीच्या सरकारने दोनदा निर्यात थांबविली. त्यांना ग्रामीण भागाचे घेणे देणे नसून शहरी मतपेढीकरिता धोरणे घेतली जात आहेत. राज्यात महायुतीला अपयश आल्याने आता त्यातून सावरण्यासाठी राज्याचे तुकडे पाडण्याचा डाव रचला आहे. प्रांतवाद व फोडतोडिच्या धोरणातून अपयशावर पांघरुण घातले जात आहे अशी टिका वळसे यांनी केली.
ज्येष्ठ नेते पिचड यांनी, सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याऐवजी विजय मल्या व स्टिल उद्योगाला मदत करत आहे. कर्जमाफी केली नाही तर दि. ५ नंतर राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. चुक दुरुस्तीकरिता भाजपाला सर्व निवडणूकांमध्ये घरी बसवा असे आवाहन पिचड यांनी केले. माजी आमदार गडाख म्हणाले, नेवासे तालुक्यात पिण्याच्या पाण्याच्या टँकरची गरज असूनही ते सुरु केले जात नाही, आमदार बाळासाहेब मुरकुटे केवळ बैठका घेत आहेत, दुष्काळ निर्मुलनासाठी ते काहीही करत नाही. भाजपाने सुरु केलेल्या जनावरांच्या छावण्यामध्ये गुंड ठेवले असून ते शेतकऱ्यांना मारहाण करुन पिटाळून लावत आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल होवून त्याची नोंद घेण्यात आली नाही. कर्जमाफ़ीसाठी आम्ही न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
यावेळी नरेंद्र घुले, श्रीमती गुंड, विठ्ठल लंघे यांची भाषणे झाली. आभार गणेश गव्हाणे यांनी मानले. मोर्चात सिताराम गायकर, प्रशांत गडाख, मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, भाऊसाहेब मोटे, सुनिल गडाख, कारभारी जावळे आदी सहभागी झाले होते.